आजी-माजी शिवसैनिकच आमने-सामने, हिंगोलीत रंगतदार लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 06:11 AM2019-04-04T06:11:56+5:302019-04-04T06:12:44+5:30

मेहनतीची गरज । मनधरणीतच गेले दिवस वाया, आता खऱ्या प्रचाराला प्रारंभ

The grand-aged Shiv Sena will fight in a face-to-face battle with Hingoli | आजी-माजी शिवसैनिकच आमने-सामने, हिंगोलीत रंगतदार लढत

आजी-माजी शिवसैनिकच आमने-सामने, हिंगोलीत रंगतदार लढत

Next

हिंगोली : लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने हेमंत पाटील यांच्या रुपाने नवीन चेहरा दिला. तर भाजपमधून काँग्रेसमध्ये घेत माजी खा.सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देवून काँग्रेसनेही पक्षाला नवीन चेहरा दिला. हे दोन्ही प्रमुख उमेदवारच आपल्या यंत्रणेसमोर चाचपडत असल्याने कार्यकर्त्यांनाच गड राखण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

मागच्या वेळी येथे काँग्रेसचे राजीव सातव यांनी अवघ्या १६३२ मतांनी शिवसेना उमेदवार सुभाष वानखेडे यांचा पराभव केला होता. यावेळी वानखेडेच काँग्रेसचे उमेदवार अन् सातव गुजरात राज्यात प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. मोदी लाटेतही सातव यांनी राखलेला हा गड यावेळी कायम राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे. शिवसेनेने हेमंत पाटील यांच्या रुपाने दमदार चेहरा समोर आणला आहे. पाटील यांनी मित्रपक्षाची बंडखोरी टाळण्यासह त्यांच्यासाठी अवघड उमेदवारांना मैदानातून बाहेर काढण्यात यश मिळविले. तर शिवसेनेतही उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्यांना सोबत घेवून त्यांच्याच खांद्यावर प्रचाराची धुरा सोपविली. नेमकाच प्रचार सुरू झाला असून सध्यातरी ही मंडळी प्रचारात दिसत आहे. भाजपची मंडळी मात्र युतीधर्मानुसार कामालाही लागली आहे. दुसरीकडे काँग्रेसचीही प्रचारयंत्रणा राबत आहे. मात्र त्याला गटा-तटाची झालर कायम आहे. त्यामुळे अजूनही म्हणावा तसा एकसंघपणा दिसत नाही.
काँग्रेस उमेदवार सुभाष वानखेडे यांच्यासाठी ही बाब डोकेदुखी ठरत आहे. तर राष्ट्रवादीची मंडळी मात्र कोणतीही कुरबूर न ठेवता कामाला लागल्याचे दिसत आहे.

दोन्ही प्रमुख उमेदवार
मराठा असल्याने जातीय गणितांचा आधार लावणे अवघड आहे. शिवाय वंचित आघाडी, बसपा अजूनही प्रभावीपणे प्रचारात उतरली नाही. त्यांचा प्रभाव वाढला तर ही आणखी एक डोकेदुखी काँग्रेसला सोसावी लागणार आहे.

मी यापूर्वी लोकसभेचा सदस्य राहिलो. मला मतदारसंघातील प्रश्नांची जाण आहे. अनेक प्रश्न सोडविले. कृषी, रेल्वे, शिक्षण, आरोग्य क्षेत्रात अनेक प्रश्नांवर काम करायचे आहे. यापूर्वीच्या सरकारने अनेक आश्वासने दिली. ती पूर्ण केली नाहीत. त्यामुळे जनता आता परिवर्तनाच्या विचारात असून त्यामुळे मला संधी देईल.
- सुभाष वानखेडे

या मतदारसंघात रेल्वे, सिंचन, शिक्षण प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यावर विशेष लक्ष देणार आहे. शिवाय मोदी सरकारने सर्व स्तरांसाठी अनेक योजना आणल्या. त्याची प्रभावी अंमलबजावणी करू. कृषीपूरक उद्योग, तरुणाईसमोरील बेरोजगारीचा प्रश्न दूर करण्यास विशेष प्राधान्य राहील. या विकासाच्या मुद्यांवरच जनता मला संधी देईल.
- हेमंत पाटील

प्रमुख उमेदवार
सुभाष वानखेडे । काँग्रेस
हेमंत पाटील । शिवसेना
मोहन राठोड । वंचित आघाडी

कळीचे मुद्दे
काँग्रेस उमेदवार सुभाष वानखेडे नुकतेच पक्षात दाखल झाले. त्यांना कोणत्याही एका गटाकडे जाता येत नाही.
शिवसेनेचे हेमंत पाटील यांचे बालपण हिंगोली जिल्ह्यात गेले असले तरीही ते नांदेडचे आमदार आहेत. त्यामुळे पक्षात थोडी नाराजी आहे.

Web Title: The grand-aged Shiv Sena will fight in a face-to-face battle with Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.