सरपणासाठी गेलेल्या नातीसह आजोबाचा विहिरीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 05:20 PM2020-04-15T17:20:43+5:302020-04-15T17:22:09+5:30
नात विहिरीत पडल्याने तिला वाचविण्याच्या प्रयत्नात आजोबासह नातीचाही पाण्यात बुडून मृत्यू
कनेरगाव नाका : हिंगोली तालुक्यातील बोडखी येथे शेतशिवारात सरपण आणण्यासाठी गेलेली नात विहिरीत पडल्याने तिला वाचविण्याच्या प्रयत्नात आजोबासह नातीचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताची घटना घडली.
बोडखी येथील सोनाली सुभाष धवसे (११) व तिची मैत्रिण रितीका या दोघी बोडखी शिवारातील शेतात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. सोनालीला तहान लागल्याने ती पाणी पिण्याकरीता विहिरीवर गेली. आधीच पडक्या असलेल्या विहिरीत उतरल्यानंतर तिचा पाय घसरून आत पडली. ती पाण्यात बुडत असल्याने रितीकाने पाहिले. तिने जवळच्याच शेतात असलेल्या चुलत आजोबा मुकिंदा लोडबा धवसे (६०) यांना सांगितले. आजोबांनी धावत जावून विहिरीत उडी टाकली. परंतु त्यांना दमाचा आजार असल्याने तेही पाण्यात बुडाले व मरण पावले. या घटनेची माहिती गावात कळताच गावातील सर्व ग्रामस्थांनी शेतातील विहिरीकडे धाव घेवून पाण्यात बुडालेल्या नातीला व आजोबाला बाहेर काढले या घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी ग्रामीणचे जमादार नंदू मस्के दाखल झाले होते.
मुलीचे आई वडील मुंबईत अडकले
सदरील घटनेतील मृत सोनाली धवसे हिचे आई-वडील सध्या मुंबई येथे आहेत. बांधकाम कामगार म्हणून ते मुंबईला गेल्यानंतर लॉकडाऊनमुळे त्यांना परतता आले नाही. मुलीला आजीकडे सोडून ते मुंबईला गेले होते. मात्र आता त्यांना मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी येणे अवघड बनले आहे. तर मुकिंदा लोडबा धवसे यांचा मुलगा नारायणगाव येथे आहे. त्यांनीही आई-वडिलांना गावी ठेवून कामासाठी स्थलांतर केले होते. त्यांच्या मुलालाही नारायणगाव येथून येता येईल की नाही, हा प्रश्न आहे.