हातातोंडाशी आलेला घास हिरावला

By admin | Published: March 2, 2015 01:43 PM2015-03-02T13:43:01+5:302015-03-02T13:43:01+5:30

खरीप हातात पडला नसल्याने रबीवर एकवटलेल्या आशा मावळल्या. गहू, ज्वारीने दाणे धरले होते तर हरभरा काढणीला आला होता. शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला.

The grass that came out of the handball was cut off | हातातोंडाशी आलेला घास हिरावला

हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Next

हिंगोली : खरीप हातात पडला नसल्याने रबीवर एकवटलेल्या आशा मावळल्या. गहू, ज्वारीने दाणे धरले होते तर हरभरा काढणीला आला होता. शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. गारपीट सोडली तर गतवर्षीचीच यंदाही पुनरावृत्ती झाल्याने उत्पादकांच्या मागे गंडांतर लागल्याची भावना आहे. 
मागीलवर्षी रबी हंगामात पावसाने पिके भुईसपाट केले होते. जनावरांचा चाराही खराब झाला होता. त्याचा परिणाम यंदाचा खरीप हंगामापर्यंत जाणवेल, असा अंदाज होता. उलट खरिपात पाऊसच झाला नाही. चाराटंचाई कायम राहिली. यंदा तीव्रता अधिक आहे. जमिनीत ओलावा नसल्याने दुप्पटीने पेरणी घटली. सर्वसाधारण पेरणी क्षेत्र १ लाख २६ हजार असून ५५ हजार ५७0 हेक्टरवर पेरणी झाली. प्रामुख्याने ३0 हजार हेक्टरवरील हरभरा काढणीस आला. काही ठिकाणी काढणीही सुरू होती. तिथे मोड फुटायची वेळ आली. कोठे घाटे गळाले. १0 आणि ११ हजार हेक्टरवरील ज्वारी आणि गहू झोपी गेला. ज्वारी काळवंडणार असून कडबाही खराब होण्याची शक्यता अधिक आहे. सर्वदूर पाऊस असताना काही ठिकाणी सोसाट्याचा वाराही होता. त्याने नुकसानीत अधिक भर पडण्याची शक्यता आहे. शनिवारी रात्रभर पाऊस झाल्यानंतर रविवारी दुपारपर्यंत रिपरिप सुरूच होती. हिंगोली शहरात रस्त्यावर पाणी साचले होते. काही ठिकाणी तळ्याचे स्वरूप आले होते. नाल्यांचे पाणी रस्त्यावरून वाहीले. कराटे स्पर्धेवर परिणाम झाला. कराटे स्पर्धेस उशीरा सुरूवात करावी झाली. बसस्थानकात पाणी साचले होते. काही बसेस उशिराने धावत होत्या. /(प्रतिनिधी)

बाळापुरात वादळीवारा
कळमनुरी तालुक्यातील बाळापूर परिसरात वार्‍यासह पाऊस झाला. शनिवारी तसेच रविवारीही पावसाने हजेरी लावली. परिसरातील सर्वच पिकांना फटका बसला. ज्वारी, गहू, हरभरा या पिकांच्या नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे. पोतरा परिसरात पाऊस 
कळमनुरी तालुक्यातील पोतरा परिसरात शविवारी रात्री साडेआठला पावसास सुरूवात झाली. रविवारी दुपारपर्यंत रिमझिम सुरू होती. परिसरातील ज्वारी, गहू आणि हरभर्‍याच्या मुळावर पाऊस उठला. त्यात प्रमुखपीक असलेल्या हरभर्‍याची अधिक नुकसान झाले. औंढय़ात दुसरा दिवस 
औंढ परिसरात शनिवारी दुपारी सव्वाएकला पावसाचे आगमन झाले. पुन्हा रात्री सव्वासातला पावसाने हजेरी लावली. रात्रीही पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले. तालुक्यात काही ठिकाणी मध्यम तर कोठे हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.

खुडज : /सेनगाव /तालुक्यातील खुडज परिसरात रविवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली. यात गहू, हरभरा, पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. अगोदरच हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांचे नैसर्गिक संकटाने पार कंबरडेच मोडले. पिकाप्रमाणे शेतकरीही आडवा झाल्याचे चित्र झाले आहे. रब्बी पिकांचा हातातोंडाशी आलेला घास बेमोसमी पावसाने पाणी फिरवले आहे. परिसरात तळणी, गोंडाळा, रिधोरा, पुसेगाव आदी परिसरामध्ये पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. /(वार्ताहर)

जवळा बाजार येथे पाऊस
जवळा बाजार : /येथे /२८ फेब्रुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी १ वाजता पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शेतकर्‍यांची धावपळ झाली. परिसरात हळद काढणे, गहू कापणी आदी कामे सुरू आहेत. ज्वारी आणि गव्हाचेही नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे हातात आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. /(वार्ताहर)


भांडेगाव परिसरात पाऊस
भांडेगाव : /हिंगोली /तालुक्यातील भांडेगाव, साटंबा, जामठी, पांगरी, नवलगव्हाण आदी भागात २८ फेब्रुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी झाल्या. नंतर रात्री ८ वाजता चांगल्या पावसाला सुरूवात झाली. भांडेगाव परिसरात हरभरा पीक सोंगून ठेवलेले पूर्णपणे भिजले. त्यातच जनावरांसाठी जमा करून ठेवलेली वैरणही भिजल्यामुळे शेतकर्‍यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आंब्याचा मोहोरही गळून पडला आहे. /(वार्ताहर)

कडोळीतही पाऊस
सेनगाव तालुक्यातील कडोळी परिसरात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता पावसाने हजेरी लावली. सध्या हरभरा अंतिम टप्प्यात पोहोचला होता. त्याला अधिक फटका बसला. ज्वारी व गव्हाचेही नुकसान झाले आहे. 


मन्नासपिंपरीत नुकसान
सेनगाव तालुक्यातील मन्नासपिंपरी परिसरात हरभर्‍याचे अधिक नुकसान झाले. पावसामुळे गहू आडवा झाला. गतवर्षी या परिसरात अधिक नुकसान झाले होते. त्यामुळे यावेळी शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. 


कनेरगावातही रिपरिप
हिंगोली तालुक्यातील कनेरगावनाका परिसरात शनिवारप्रमाणे रविवारीही रिपरिप होती. यंदा या परिसराला दुबार पेरणीला सामोरे जावे लागले होते. पुन्हा अवकाळी पावसाने सर्वच पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी नाराज आहे.


हट्टा परिसरात नुकसान
हट्टा : परिसरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस व वार्‍यामुळे कापणीला आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी पिकांचे नुकसान झाले आहे. रिमझिम पावसामुळे हरभरा, हळदी पिकांचे नुकसान झाले आहे. गतवर्षी प्रमाणे याही वर्षी सुगीच्या काळात अवकाळी पाऊस झाला. तर यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने शेतकर्‍यांचे सोयाबीन, कापूस पीके वाया गेली आहेत. कसे तरी रबी पिके येतील या आशेवर शेतकरी आनंदित झाला होता; परंतु अवकाळी पाऊस व वार्‍यामुळे रबीचे गहू, ज्वारी, हरभरा आदीचे नुकसान झाले आहे.

Web Title: The grass that came out of the handball was cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.