माझी वसुंधरा अभियांनातर्गत हरित शपथ व सुंदर माझे कार्यालय अभियानाची सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:25 AM2021-01-02T04:25:32+5:302021-01-02T04:25:32+5:30
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. आर. माळी व विभाग प्रमुख, ...
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. आर. माळी व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयांचे गटविकास अधिकारी व कर्मचारी व्हिडिओ कॉन्फरन्सला उपस्थित होते. यावेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकाच वेळी शपथ देण्यात आली. विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयांमध्ये २८ डिसेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सुंदर माझे कार्यालय’ अभियानाची रूपरेषा ठरविण्यात आली. नवीन वर्षाच्या दिवशी या अभियानाची सुरुवात झाली. या अभियानांतर्गत तीन भाग असून, त्यामध्ये कार्यालयीन स्वच्छता, प्रशासकीय बाबी व कर्मचारी लाभ यांचा समावेश आहे. कार्यालयीन स्वच्छतेमध्ये कार्यालयाची अंतर्बाह्य स्वच्छता, रेनवॉटर हार्वेस्टिंग, सोलारचा वापर, वृक्षारोपण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कार्यालयाची रंगरंगोटी इत्यादी महत्त्वाच्या बाबी आहेत. प्रशासकीयमध्ये झीरो पेन्डन्सी, अभिलेख वर्गीकरण, जुन्या साहित्यांचे निर्लेखन, जि.प.च्या मालमत्ता मालकी हक्कात नोंद करणे, पेपर लेस कार्यालय, डीबीटीप्रणालीचा १०० टक्के वापर, आदींचा समावेश आहे. कर्मचारी लाभविषयक बाबींमध्ये कर्मचाऱ्यांना स्थायित्वाचा लाभ देणे, पदोन्नती देणे, विविध सेवांविषयक लाभांच्या प्रकरणाचा निपटारा करणे, आदी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. सुंदर माझे कार्यालय अभियानाची सुरुवात जि.प. कार्यालयामध्ये प्रत्येक विभागासमोर झाडांच्या कुंड्या ठेवून करण्यात आली आहे.