अधिकारी असल्याचे सांगत किराणा व्यापाऱ्यास दिवसाढवळ्या चोरट्यांनी लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 08:08 PM2021-01-11T20:08:02+5:302021-01-11T20:08:24+5:30
व्यापाऱ्यास लुटण्याची घटना वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
कुरुंदा (जि. हिंगोली) : येथील राजकुमार किराणा दुकानाचे व्यापारी प्रल्हाद गुळगुळे हे बँकेत पैसे जमा करण्यासाठी बॅग घेऊन जात होते. यावेळी चोरट्यांनी त्यांना थांबवून बॅगेत काय आहे? असे विचारून त्यांच्या बॅगेतून दोन लाख रुपये काढून घेऊन दुचाकीवरून धूम ठोकली. सिनेस्टाईलने दिवसाढवळ्या व्यापाऱ्यास लुटण्याची घटना वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
कुरुंदा येथील राजकुमार किराणा हे होलसेल दुकान आहे. बँकेत पैसे भरण्यासाठी व्यापारी प्रल्हाद गुळगुळे हे पायी बॅग घेऊन बँक निघाले होते. गावातील मुख्य रस्त्यावरील पुलाजवळ या व्यापाऱ्यास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी थांबविले. आम्ही अधिकारी असल्याचे भासवून ‘तुझ्या बॅगेत काय आहे?’ असे खडसावून विचारले. व्यापाऱ्याने भीतीपोटी त्यांना बॅग उघडी करून दाखवली असता दोन लाख काढून घेतले. बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला; परंतु व्यापाऱ्याने बॅग न सोडल्यामुळे इतर रक्कम वाचली. त्या बागेत ३ लाख ७५ हजार रुपये होते. त्यातील २ लाख रुपये रोख रक्कम चोरट्यांनी घेऊन धूम ठोकली. व्यापाऱ्याने बॅग न सोडल्यामुळे १ लाख ७५ हजार सहीसलामत वाचले. चोरट्यांनी सिनेमा स्टाईलने रक्कम लुटून दुचाकीवरून धूम ठोकली. दिवसाढवळ्या लुटण्याचा प्रकार घडल्याने कुरुंदा येथे खळबळ उडाली आहे.
कुरुंदा ही हिंगोली जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असून व्यापाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे? दिवसाढवळ्या झालेल्या सिनेस्टाईलने लुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून त्या चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये या चोरट्यांचे चेहरे कैद झाले असून चोरट्याकडे विनानंबरची मोटारसायकल होती. काळा चष्मा लावून तोंडाला मास्क लावलेले हे चोरटे होते. हे चोरटे गावात फिरले. नंतर त्यांनी ही चोरी केली. दिवसाढवळ्या लुटून भरवेगाने मोटारसायकलने धूम ठोकत मुख्य बाजारपेठमधून चोरटे पळाले. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया कुरुंदा पोलीस ठाण्यात सुरू होती. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणीही केली. सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत.