भूजल पातळीत १.२७ मीटरने घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 11:34 PM2018-05-06T23:34:09+5:302018-05-06T23:34:09+5:30
दिवसेंदिवस सूर्य आग ओकत असून जिल्ह्याची भूजल पातळी १.२७ मीटरने खालावली आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दिवसेंदिवस सूर्य आग ओकत असून जिल्ह्याची भूजल पातळी १.२७ मीटरने खालावली आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरासह ग्रामीण भागातील विहिरी व बोअर आटत चालल्या असून भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून मे महिन्या शेवटच्या आठवड्यात भूजल पातळीचे मोजमाप केले जाणार आहे.
दरवर्षी अत्यल्प पर्जन्यमान होत असून भूजलपातळी खालावत चालली आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील ५० निरीक्षण विहिरींतील पाणीपातळीच्या नोंदी घेतल्या जातात. भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून मार्चमध्ये घेण्यात आलेल्या नोंदीनुसार हिंगोली तालुक्यातील भूजलपातळी १.५० मीटर खोलीवर गेल्याचे दिसून आले. औंढा नागनाथ तालुक्यात १.४९ मीटर, वसमत तालुक्याची २.०७ मीटर, कळमनुरी ०.२५ मीटर, १.०३ मीटर असून जिल्ह्याची भूजल पातळी -१.२७ मीटरने खालावली आहे. यात औंढा-९.६४ मीटर, वसमत-१४.५0, हिंगोली ९.७७, कळमनुरी-९.0६, सेनगाव ९.९७ मीटर या खोलीवर पाणी आहे. भूजलपातळी खालावत असल्यामुळे विहिरी, बोअर कोरडे पडत चालले आहेत. त्यामुळे अनेक गावांत वाड्या-वस्त्या, तांड्यावर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. भूजलपातळीतील घट जलसंकट निर्माण करणार हे निश्चित आहे. यावर उपाय-योजना केल्या जात आहेत. जि. प.च्या यांत्रिकी विभागातर्फे ग्रामीण भागात २४ एप्रिलपासून बोअर घेण्याचे काम सुरू आहे. परंतु अनेक बोअर कोरडे जात असून काही बोअरला पाणी लागत आहे, अशी माहिती मिळाली. भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत घेतलेल्या निरीक्षण विहिरीतील नोंदीवरून तालुकानिहाय भूजल पातळीतील घट जाहीर करण्यात आली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ५० गावांतील निरीक्षण विहिरींची भूजल पातळी घेण्यात येणार असल्याचे यंत्रणेमार्फत सांगण्यात आले.
जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागातर्फे २४ एप्रिलपासून ग्रामीण भागात नवीन बोअर घेण्याचे कामे सुरू आहेत. बोअरसाठी एकूण जवळपास १७७ प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी ९४ प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून सध्या बोअरची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.
आतापर्यंत ४० बोअरची कामे पूर्ण झाली आहेत. लवकरच बोअरवर हातपंप बसविले जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे. परंतु भूजलपातळीच घटल्याने अनेक ठिकाणचे बोअर कोरडे जात आहेत.
जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकट करण्यासाठी तसेच शासनाच्या विविध उपाय-योजना राबविण्यात येत आहेत.