पालकमंत्री पाणंद योजनेची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:46 PM2018-03-16T23:46:13+5:302018-03-16T23:46:17+5:30
विविध योजनांच्या एकत्रिकरणातून पालकमंत्री शेतपाणंद रस्ते योजना राबविण्यात येणार असून यासाठी आराखडे तयार करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आज घेतलेल्या बैठकीत दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : विविध योजनांच्या एकत्रिकरणातून पालकमंत्री शेतपाणंद रस्ते योजना राबविण्यात येणार असून यासाठी आराखडे तयार करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आज घेतलेल्या बैठकीत दिला.
शासनाने पाणंद रस्ते, शेत रस्ते, पाय रस्ते, गाडीमार्ग अतिक्रमणमुक्त करून त्या ठिकाणी कच्चा अथवा पक्का रस्ता तयार होण्यासाठी ही योजना काढली आहे. या रस्त्यांचे मजबुतीकरण ठरवून दिलेल्या अंदाजपत्रकाप्रमाणे करता येणार आहे. तर हे रस्ते अतिक्रमणमुक्त करून कच्चा रस्ता तयार करण्यास ५0 हजार रुपये प्रतिकिमी खर्च दिला जाणार असून त्यापेक्षा जास्त रक्कम लागल्यास लोकसहभागातून भरावी लागेल. कच्चा व पक्का रस्ता एकत्रच करायचा झाल्यास वरीलप्रमाणेच निधी मिळेल. यासाठी राज्य, जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर समित्या राहतील.
ग्रामस्तरीय समितीने सरपंचांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतरस्त्याचा प्रस्ताव ठरावासह तहसीलदारांकडे पाठवायचा आहे. या रस्त्यालगतचे शेतकरीच या समितीत सदस्य असतील. उपविभागीय अधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील तालुका समितीसमोर हे प्रस्ताव आल्यानंतर अतिक्रमण दुरुस्तीचा प्रस्ताव व रस्ते आराखडा बनवायचा आहे. जिल्हा स्तरीय समितीकडे ग्रा.पं., महसूल, भूमिअभिलेख, पोलीस यंत्रणेच्या नियमित बैठका घेवून ही कामे तातडीने होतील, हे पहायचे आहे. यात गरज पडल्यास बंदोबस्तासाठी पोलिसांनी तर मोजणीसाठी भूमिअभिलेख विभागाने शुल्क आकारू नये, असा आदेश आहे. तर ही कामे प्राधान्याने करायची आहेत. तर ही रस्त्यांची कामे कोणत्याही निधीतून अथवा निधी एकत्र करून करता येतील.