हिंगोलीत २० लाखांचा गुटखा पकडला; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 03:35 PM2021-09-23T15:35:48+5:302021-09-23T15:36:51+5:30
मध्यप्रदेशातून एका ट्रकमध्ये गुटख्याची पोते नांदेडकडे नेली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.
हिंगोली : येथील हिंगोली ते नांदेड मार्गावरील सावखेडा गावाजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल २० लाख ४५ हजारांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई २२ सप्टेंबर रोजी करण्यात आली. याप्रकरणी ८ जणांवर बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मध्यप्रदेशातून एका ट्रकमध्ये गुटख्याची पोते नांदेडकडे नेली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, अभय माकणे, भाग्यश्री कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी बोके, संभाजी लेकुळे, राजू ठाकुर, विठ्ठल कोळेकर, नितीन गोरे, सुनील अंभोरे, जावेद शेख, शंकर ठोंबरे , किशोर सावंत, विठ्ठल काळे, प्रशांत वाघमारे, आकाश टापरे, सुमित टाले, रोहित मुदीराज यांच्या पथकाने २२ सप्टेंबर रोजी दुपारपासून वाहनांची तपासणी सुरु केली होती.
यावेळी एम.पी.०९ एच.जी. ०९५६ क्रमांकाचा ट्रक थांबवून पोलिसांनी चालकाकडे ट्रकमधील मालाविषयी चौकशी केली. मात्र चालकास पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी सदर ट्रक ताब्यात घेऊन बासंबा पोलिस ठाण्यात लावला. त्यानंतर पोलिसांनी ट्रकमधील साहित्याची तपासणी केली असता त्यात इतर साहित्यासह विविध कंपनीचा २० लाख ४५ हजारांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटख्याच्या मालासह ४५ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी बोके यांच्या फिर्यादीवरून चालक बाबूलाल नथूलाल कुशवाह (रा. रूस्तूमपूर जि. खंडवा), क्लिनर भीम फुलचंद तडवी (रा. रुस्तुमपूर, जि. खंडवा, मध्यप्रदेश), शेख फैजान (रा. इंदौर), महमद फारुख महमद शफी (रा. इंदौर), विकी चौरसीया ( रा. इंदौर), सलीम गोल्डन जर्दाचे व्यापारी, अकबर चाऊस, खयूम (पूर्ण नाव माहित नाही रा. नांदेड) याचे विरुध्द बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक उदय खंडेराय करीत आहेत.