हिंगोलीत इंचा येथे पाण्यासाठी घागरमोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 03:02 PM2018-05-19T15:02:50+5:302018-05-19T15:02:50+5:30
तालुक्यातील इंचा येथे ग्रामस्थांनी पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून ठिय्या मांडला आहे. या गावात गेल्या अनेक दिवसांपासून टंचाईची समस्या जीवघेणी बनली असतानाही ग्रामपंचायत काहीच उपाययोजना करीत नसल्याने हा मोर्चा काढला.
हिंगोली : तालुक्यातील इंचा येथे ग्रामस्थांनी पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून ठिय्या मांडला आहे. या गावात गेल्या अनेक दिवसांपासून टंचाईची समस्या जीवघेणी बनली असतानाही ग्रामपंचायत काहीच उपाययोजना करीत नसल्याने हा मोर्चा काढला.
हिंगोली शहरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या इंचा येथे पाणीटंचाईने कळस गाठला आहे. याबाबत ग्रामपंचायत व प्रशासनाला निवेदने देवूनही काहीच उपाययोजना झाली नाही. ग्रामस्थांनी शेवटी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र तरीही फारसा फरक पडला नाही. ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांना विचारणा केली तर तेही उडवाउडवीची उत्तरे देत होते. तहसीलमध्ये जावूनही काहीच फरक पडला नाही. शेवटी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख विजय राऊत, रिपाइंचे सर्कल अध्यक्ष सिद्धार्थ चक्के, ग्रामस्थ कैलास चक्के यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता आंदोलनास प्रारंभ झाला. या आंदोलनात महिला व लहान मुलेही मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून येत होते. ग्रामस्थ तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत असून गावातील पाणीप्रश्न जाणीवपूर्वक सोडविला जात नसल्याचा आरोप केला जात आहे.