एनटीसी, नांदेड नाक्यासह नऊ ठिकाणी दुचाकी सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:33 AM2021-09-22T04:33:22+5:302021-09-22T04:33:22+5:30

हिंगोली : शहरातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रकार घडत आहेत. शहरातील एनटीसी, नांदेड नाका, मोंढा, पलटन आदी नऊ ठिकाणी चोरट्यांनी ...

Handle bikes at nine places including NTC, Nanded Naka | एनटीसी, नांदेड नाक्यासह नऊ ठिकाणी दुचाकी सांभाळा

एनटीसी, नांदेड नाक्यासह नऊ ठिकाणी दुचाकी सांभाळा

Next

हिंगोली : शहरातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रकार घडत आहेत. शहरातील एनटीसी, नांदेड नाका, मोंढा, पलटन आदी नऊ ठिकाणी चोरट्यांनी संधी साधून दुचाकी पळविल्या आहेत. त्यामुळे या भागात दुचाकी उभी करताना खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.

कोरोना काळात हातचा गेलेला रोजगार व लागलेली विविध व्यसने यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात नवीन चेहरे येत आहेत. असे गुन्हेगार शोधणे पोलिसांसमोर आव्हान बनले असून यातूनच दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात ८१ दुचाकी चोरीला गेल्या आहेत. यात सर्वाधिक दुचाकी वसमत शहर पोलीस ठाणे हद्दीतून चोरीला गेल्या आहेत. आठ महिन्यात तब्बल २५ दुचाकी चोरीला गेल्या आहेत. त्यानंतर हिंगोली शहरातून १९ दुचाकी चोरट्यांनी लांबविल्या. तर कुरुंदा व आखाडा बाळापूर ठाणे हद्दीतून प्रत्येकी ७ दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याशिवाय कळमनुरी पोलीस ठाणे हद्दीतून ६ दुचाकी चोरीला गेल्या आहेत. तर इतर ठाणे हद्दीत १ ते ३ दुचाकी चोरीस गेल्या आहेत. हिंगोली शहरातील एनटीसी, नांदेड नाका, पलटन, बसस्थानक, रेल्वे स्थानक, जुना मोंढा, जिजामाता नगर, पंचायत समिती परिसर, तहसील परिसर आदी भागातून दुचाकी चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे या भागात दुचाकी उभी करताना खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.

आतापर्यंत ८ दुचाकी सापडल्या

जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीतील १४ दुचाकींचा पोलिसांनी शोध घेतला आहे. यात हिंगोली शहर पोलीस ठाणे हद्दीतील ८ दुचाकी शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. इतर ठाण्याच्या तुलनेत हिंगोली शहर पोलीस ठाणे हद्दीतील दुचाकी शोधण्याचे प्रमाण जास्त आहे.

२४ दुचाकी जप्त

येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथके नियुक्त केली आहेत. मागील आठ महिन्यात काही दुचाकी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून तीन कारवाईत २४ दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण घटले असले तरी चोरीला गेलेल्या सर्व दुचाकींचा शोध घेण्याचे आव्हान कायम आहे.

दुचाकी चोरीला जाऊ नये, यासाठी दुचाकीचे हँडल लॉक लावणे आवश्यक आहे. याशिवाय घराच्या कंपाऊंडमध्ये दुचाकी ठेवून साखळी बांधल्यास चोरीच्या घटना टाळण्यास मदत होईल. बाजारपेठेत जागा असल्यास शक्यतो सीसीटीव्ही कॅमेरा असलेल्या भागात दुचाकी उभी करावी. तसेच कमी किमतीत मिळणारी दुचाकी चोरीची असू शकते. दुचाकी चोरट्यांबदल काही माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा.

- उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली

हिंगोली शहरातील या भागात सर्वाधिक धोका !

एनटीसी: हिंगोली शहरातील एनटीसी भागातून यापूर्वी दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना आहेत. रात्रीला इतर भागाच्या मानाने वर्दळ कमी असते. याच संधीचा फायदा दुचाकी चोरटे उठवित असल्याचे दिसून येत आहे.

नांदेड नाका: नांदेड नाका भागातूनही यापूर्वी दुचाकी चोरीला गेल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत या भागात नागरिकांची वर्दळ असली तरी चोरटे शिताफीने दुचाकी लांबवितात. या भागात वाहने उभी करताना खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.

पलटन: हिंगोली शहरातील पलटन भागातून मागील आठ महिन्यात दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे या भागातही दुचाकी उभी करताना आपली दुचाकी सुरक्षित राहील याची काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

बसस्थानक : बसस्थानक भागात सायंकाळी उशिरापर्यंत नागरिकांची वर्दळ असते. नातेवाईकांना घेण्यासाठी किंवा सोडण्यासाठी दुचाकीधारक येतात. बस येईपर्यंत थांबावे लागते. याचवेळी दुचाकी चोरटे संधी साधतात.

आकडे काय सांगातात ?

आठ महिन्यात जिल्ह्यातील दुचाकी चोरी - ८१

दुचाकी सापडल्या - १४

दुचाकी जप्त - २४

Web Title: Handle bikes at nine places including NTC, Nanded Naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.