बँकेतील पैसा सांभाळा; केवायसीच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:20 AM2021-07-21T04:20:48+5:302021-07-21T04:20:48+5:30

हिंगोली : सायबर गुन्हेगार फसवणुकीचे वेगवेगळे फंडे शोधून फसवणूक करीत आहेत. आता थेट नागरिकांच्या बँक खात्यावर चोरट्यांनी डोळा ठेवला ...

Handle money in the bank; Fraud can happen under the name of KYC! | बँकेतील पैसा सांभाळा; केवायसीच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक !

बँकेतील पैसा सांभाळा; केवायसीच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक !

googlenewsNext

हिंगोली : सायबर गुन्हेगार फसवणुकीचे वेगवेगळे फंडे शोधून फसवणूक करीत आहेत. आता थेट नागरिकांच्या बँक खात्यावर चोरट्यांनी डोळा ठेवला असून केवायसीच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. जिल्ह्यात अद्याप अशी एकही घटना घडली नसली तरी बँक खात्यातून पैसे गायब झाल्याच्या तसेच आधार कार्ड, पॅन कार्डाचा गैर वापर झाल्याचे समोर आले आहे.

इंटरनेटचे जाळे दुर्गम भागातही पसरल्याने प्रत्येक जण ऑनलाइन झाला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरसारख्या माध्यमाचा वापरही वाढला आहे. पैशांची देवाण-घेवाणही ऑनलाइन होत आहे. यातून सुविधा उपलब्ध झाली तरी धोकाही तेवढाच वाढला आहे. यापूर्वी फेसबुक, व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटना घडल्या. आता केवायसीच्या नावाखाली सायबर चोरटे फसवणूक करीत असल्याचे समोर आले आहे.

केवायसीच्या नावाखाली आधार, पॅन कार्डसारखी कागदपत्रे ऑनलाइन मागितली जात आहेत. भीती व प्रलोभनामुळे अनेक जण याला बळी पडत आहेत. ऑनलाइनच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक होऊ नये, म्हणून सायबर पोलिसांचे पथक जनजागृती करीत आहे. तरीही काही जण याला बळी पडत आहेत. नागरिकांनी मोबाइलवर ॲप डाऊनलोड करताना काळजी घ्यावी, एटीएमचा पासवर्ड, ओटीपी नंबर कोणालाही सांगू नये, बँक खात्याविषयी काही शंका असल्यास थेट बँकेत जाऊन शंकाचे निरसन करावे, असा सल्ला सायबर कक्षाने दिला आहे.

अशी होऊ शकते फसवणूक

प्रकरण १

कळमनुरी शहरातील एका वकिलाची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली.

त्यांच्या बँक खात्यातून जवळपास ४५ हजार रुपये

सायबर चोरट्यांनी काढून घेतले. तुम्ही फाेन पे जास्त वापरता. त्यामुळे तुम्हाला ९ हजार ९०० रुपये बोनस मिळणार असल्याचा मेसेज आला होता. तसेच नोटिफिकेशनवर क्लिक करा, नोटिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, असे समोरील व्यक्तीने साांगितले. त्यानुसार नाेटिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर काही वेळात समोरील व्यक्तीने टप्प्याटप्प्याने ४५ हजार रुपये काढून घेतले. विशेष म्हणजे बँक खात्यातून पैसे काढले जात आहेत, याचा मेसेजही आला नव्हता. नंतर यात आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

प्रकरणी २

सेनगाव येथील एका व्यक्तीला तुम्हाला लोन मंजूर झाले आहे. यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड पाठवून द्या, असे फोनवरून एकाने सांगितले. लोन मिळणार असल्याने सेनगाव येथील व्यक्तीने आपले आधार कार्ड व पॅन कार्ड दिलेल्या लिंकवर सबमिट केले. मात्र, समोरील व्यक्तीने थेट कोलकत्ता येथे बँक खाते काढले. त्यात फ्रॉड करून मिळविलेले पैसे जमा करण्यात आले. कोलकात्ता पोलिसांनी यासंदर्भातील नोटीस पाठविली तेव्हा आपल्या कागदपत्राच्या आधारे कोलकात्ता येथे बनावट खाते उघडल्याचे सेनगावातील व्यक्तीला समजले. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक शिवसांब घेवारे करीत आहेत.

गेलेला पैसा परत मिळणे कठीण

ऑनलाइन माध्यमातून एकदा फसवणूक झाल्यास पुन्हा पैसे मिळण्याची शक्यता कमीच असते. तरीही फसवणूक झाल्यानंतर काही मिनिटांत सायबर सेलला माहिती दिल्यास सायबर सेलचे कर्मचारी पैसे मिळवून देऊ शकतात. मात्र, तरीही शंभर टक्के पैसे परत मिळतीलच असे सांगता येत नाही.

कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता अनोळखी व्यक्तीला कागदपत्रे देऊ नयेत. तसेच मोबाइलवरून अनोळखी ॲप डाऊनलोड करू नये, ओटीपी, पासवर्ड कोणालाही सांगू नये. ऑनलाइन फसवणूक झाल्यास तात्काळ स्थानिक पोलीस अथवा सायबर सेलकडे तक्रार द्यावी.

- राकेश एम. कलासागर, पोलीस अधीक्षक, हिंगोली

Web Title: Handle money in the bank; Fraud can happen under the name of KYC!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.