दुसऱ्यांच्या दिवाळीतच पालावरच्यांना आनंद; फाटक्या कापडांवरच बच्चे कंपनीचा निरागस उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 05:46 PM2020-11-20T17:46:52+5:302020-11-20T17:47:38+5:30
काही ठिकाणी सामाजिक दातृत्वाचा अनुभव येतो मात्र येथे तसे काही घडले नाही. त्यामुळे जे मिळेल तेच गोड मानून आनंद लुटला.
हिंगोली : आधीच कोरोनाचे संकट आणि त्यात व्यवसायही चांगला झाला नसल्याने यामुळे यंदा भटक्या विक्रेत्यांकडे दिवाळी साजरी करण्यासाठी पुरेशी रक्कम नसल्याने बिकट अवस्थेतच हा सण साजरा करावा लागला. यंदा कोणी मदतीचा हातही पुढे केला नसल्याचे दिसून आले.
हिंगोली येथील अकोला बायपास भागात मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून आलेल्या विक्रेत्यांनी मागील आठ ते दहा दिवसांपासून बस्तान मांडले आहे. जवळपास दहा ते पंधरा झोपड्यांमध्ये या मंडळींनी संसार थाटला आहे. दिवाळी त्यांनी येथेच साजरी केली. मात्र यावर्षी चांगला व्यवसाय झाला नसल्याने दिवे लावून साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करावी लागली. मुलाबाळांना चांगले कपडेही घेता आले नाहीत. यंदा दोन ट्रक माल आणला असताना अर्धाही विक्री झाला नाही. त्यामुळे आर्थिक चणचण सोसावी लागली. काही ठिकाणी सामाजिक दातृत्वाचा अनुभव येतो मात्र येथे तसे काही घडले नाही. त्यामुळे जे मिळेल तेच गोड मानून आनंद लुटला.
दिवाळी काय खरेदी केले?
मुलांनी आग्रह केल्यामुळे थोड्याबहुत प्रमाणात फटाके आणून फोडले. त्यावरच दिवाळीच्या सणाचा आनंद लुटला मिळालेल्या पैशातून गोड-धोड केले. मात्र आणलेला मालविक्री न झाल्याने अंगावर कर्ज असल्याने त्याची गोडी अनुभवता आली नाही.
मुलांनी कसा लुटला आनंद
या झोपडीमधील लहान मुलांनी सांगितले की, दुसऱ्यांनी फोडलेल्या फटाक्यांवर आम्ही समाधान मानले. आकाशात होणारी आतषबाजीचे रोषणाई हीच आमची दिवाळी होती. तसे काही फटाके पालकांनी आणून दिले होते. त्यावरच समाधान मानले.
कोरोनामुळे काही कायम परिणाम झाला
याबाबत शंकर टाकिया म्हणाले की, आम्ही दरवर्षी महाराष्ट्रात विविध भागात असे साहित्य विक्रीला आणत असतो. मात्र यंदा या साहित्याला ग्राहक मिळत नाही. साडी अथवा जुन्या कापडावरही आम्ही प्लास्टिक भांडी विकतो. रोख रक्कम असल्यास पन्नास रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत किंमत आहे. पुढील काळात चांगला व्यवसाय होईल. असे वाटते .
दरवर्षीच असते भटकंती
दिवाळीच्या सणासाठी साधारणपणे सगळे गावाकडे जाण्यासाठी आग्रही असतात. मात्र गावाकडे शेतीवाडी नसलेल्या या आदिवासी भटक्यांना फिरून माल विकण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मुलांना प्रत्येक वर्षी नव्या ठिकाणी जावून व्यवसाय करीत दिवाळी साजरी करावी लागते. त्यात व्यवसाय चांगला झाला तर कपडेलत्ते व फटाके मिळतात. अन्यथा तसेच दिवस काढावे लागतात.