शेतकऱ्यांत आनंदोत्सव! वसमतच्या मोंढ्यात हळद पुन्हा ३० हजारांवर पोहोचली
By विजय पाटील | Published: August 8, 2023 07:32 PM2023-08-08T19:32:49+5:302023-08-08T19:33:13+5:30
१३ हजार ते २१ हजारापर्यंत काही लॉट सुटले; ७ हजार कट्ट्यांची झाली आवक
- इस्माईल जाहागिरदार
वसमत (जि. हिंगोली): येथील कृऊबा बाजार समिती मोंढ्यात हळदीचे दर उच्चांकी गाठत आहेत. मोंढ्यात मंगळवारी ७ हजार कट्ट्यांची आवक झाली. बोली बिटात १३ हजार ते ३० हजार १०० रुपयांपर्यंत हळदीला दर मिळाला. यापूर्वीही बिटात हळद ३० हजार रुपयांवर हळद गेली होती. गत ५ दिवसांत हळदीचा डबा घसरला होता. मंगळवारी झालेल्या बिटात सर्वाधिक ३० हजार १०० व त्यानंतर २१ हजारांचा दर हळदीस मिळाला.
वसमतच्या मोंढ्यात गत पाच दिवसापासून हळदीचे दर १५ हजारावरही जात नव्हते. ८ ऑगस्ट रोजी हळदीच्या ७ हजार कट्ट्यांची आवक झाली. हळदीचे बोली बिट झाले तेंव्हा बिटात हळदीस १३ हजार ते २१ हजार रुपयांचा दर मिळाला. शेतकरी व्यंकटेश कदम (रा. रोडगा) यांच्या दर्जेदार हळदीच्या ५१ कट्ट्यांना ३० हजार १०० रुपयांचा दर मिळाला. गत पाच दिवसांपासून हळदीचे दर स्थिर होते. मंगळवारी आवक मोठ्या प्रमाणात झाली. दिवसेंदिवस हळदीचे दर वाढत असल्याने ज्यांच्याकडे हळद शिल्लक आह, अशा शेतकऱ्यांत आनंद व्यक्त केला जात आहे. मोंढ्यात हळदीला उच्चांकी दर मिळत असल्याने नांदेड, परभणी जिल्ह्यांसह इतर भागातील हळद वसमतच्या मोंढ्यात विक्रीसाठी येत आहे.
उच्चांकी दराचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा ....
८ ऑगस्ट रोजी कृऊबा समीती मोंढ्यातील बिटात पुन्हा सर्वाधिक ३० हजार १०० रुपयांवर दर्जेदार हळदीस दर मिळाला. शेतकऱ्यांनी शेतीमाल मोंढ्यात विक्री करुन हळद दराच्या तेजीचा फायदा घ्यावा.
-तानाजी बेंडे, सभापती, कृउबा वसमत
हळदीचे दर यापेक्षाही वाढतील...
दर्जेदार हळदीस उच्चांकी दर मिळत आहे. ८ ऑगस्ट रोजी झालेल्या बोली बिटात ५१ कट्ट्यांच्या लॉटला ३० हजार १०० रुपयांचा दर मिळाला आहे. दर्जेदार हळीचे दर यापुढेही वाढतील, अशी अशा आहे.
- पुष्पेंद्र अकरबोटे, व्यापारी, वसमत
३० हजार १०० रुपये दर चांगलाच...
कृऊबा समीती मोंढ्यात दर्जेदार हळदीचे ५१ कट्टे बिटात टाकले होते. हळद दर्जेदार व चांगली होती. ३० हजार १०० दर मिळाला. हा दर मिळेल असे वाटले नव्हते.
- व्यंकटेश कदम, शेतकरी, रा.रोडगा.