बायकोकडून होतोय छळ; कोरोनाकाळात १४० तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:25 AM2021-07-25T04:25:27+5:302021-07-25T04:25:27+5:30
हिंगोली : विवाहित महिलांचा जसा सासरी छळ होतो, तसाच छळ विवाहित पुरुषांचाही पत्नीकडून होत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येत ...
हिंगोली : विवाहित महिलांचा जसा सासरी छळ होतो, तसाच छळ विवाहित पुरुषांचाही पत्नीकडून होत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येत आहेत. कोरोनाकाळात तर पती-पत्नीमधील सर्वाधिक वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेले आहेत. कोरोनाच्या दीड वर्षात ६३३ महिलांनी पतीविरोधात जशा छळाच्या तक्रारी दिल्या तशाच १४० पुरुषांनीही पत्नीविरोधात तक्रारी नोंदविल्या आहेत.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध घालण्यात आले होते. या काळात बहुतांश वेळ पती-पत्नी घरातच थांबत होते. जास्त वेळ एकत्र थांबल्यामुळे त्यांच्यात स्नेह वाढण्याऐवजी कौटुंबिक वादच जास्त झाल्याचे पाहावयास मिळाले. आताही कौटुंबिक वादाचे प्रकार घडत आहेत. यात पतीकडून जसा छळ होतो तसाच पत्नीकडूनही छळ होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. येथील ‘भरोसा सेल’कडे २०२० मध्ये ९२, तर २०२१ मध्ये ४८ पुरुषांनी पत्नीविरुद्ध तक्रारी नोंदविल्या आहेत. खरे तर यापेक्षा जास्त पतीचा छळ होत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. लोक काय म्हणतील या भीतीने पोलीस ठाण्यात तक्रारी देण्यात पत्नीपीडित पती पुढे येत नसल्याचे समोर येत आहे. यातून संसार तुटण्याची भीती असते. त्यामुळे अशा तक्रारी ‘भरोसा सेल’कडे पाठविल्या जातात. तेथे समुपदेशन करून तुटण्याच्या मार्गावरील संसार पुन्हा जुळविण्याचा प्रयत्न केला जतो.
कोरोनाकाळात तक्रारी वाढल्या
कोरोनामुळे पती-पत्नीला घरात थांबण्यास वेळ मिळत होता. सुरुवातीला एकमेकांना समजून घेणाऱ्या जोडप्यांमध्ये किरकोळ कारणावरून उणे-दुणे काढण्यास सुरुवात झाली. शेवटी कौटुंबिक छळापर्यंत ही प्रकरणे पोहोचली. या काळात जवळपास १४० पुरुषांनी, तर ६३३ महिलांनी छळाच्या तक्रारी केल्या आहेत.
आर्थिक टंचाई आणि अति सहवास
सर्वांत जास्त वाद हे आर्थिक कारणावरूनच होत आहेत. इतरांप्रमाणे आपल्याही घरी सुखसोयी असाव्यात, अशी अपेक्षा दोघांनाही असते. मात्र, आर्थिक कारणामुळे या अपेक्षा पूर्ण होण्याला तडा जातो. त्यातून वादाचे प्रकार होऊन प्रकरणे घटस्फोटापर्यंत जात आहेत. त्यात दोघेही जास्त वेळ अतिसहवासात असल्यास दररोज एकमेकांचे उणे-दुणे काढण्याची संधी साधली जाते. यातून कौटुंबिक वादात भर पडत आहे.
पुरुषांच्या हक्कासाठी कोण लढणार?
महिलांवरील अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी विविध संघटना कार्यरत आहेत. मात्र, पुरुषांच्या होत असलेल्या छळाविरुद्ध लढण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात एकही संघटना नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुरुषांच्या हक्कासाठी कोण लढणार, असा प्रश्न पत्नीपीडितांमधून विचारला जात आहे.
मानसिक छळ नव्हे, मारहाणही करते !
१) पुरुषांनी पत्नीविरोधात तक्रारी दिल्या आहेत. त्यात पत्नीकडून मानसिक त्रास होत असून, कधी-कधी पत्नी मारहाणही करते, असेही समुपदेशनावेळी समोर आले आहे.
२) पत्नी व्यवस्थित वागत नाही, वारंवार माहेरी जाते, संशय घेणे आदी कारणे पुरुषांनी पत्नीविरोधात नोंदविलेल्या तक्रारीत नमूद केली आहेत.
३) किरकोळ कारणावरून वाद घालणे, तसेच तिच्या मनाप्रमाणे काही झाले नाही की हातही उगारते, असे एका पत्नीपीडिताने सांगितले.
बायकोकडून छळ होत असल्याच्या तक्रारी
२०२० -९२
जूनअखेर २०२१ - ४८