हिंगोलीत ताकतोडापाठोपाठ ‘हाताळा’ही निघाले विक्रीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 11:48 AM2019-07-25T11:48:20+5:302019-07-25T11:56:32+5:30
ग्रामस्थांसोबतची जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा निष्फळ
सेनगाव (जि. हिंगोली) : गाव विक्रीला काढलेल्या ताकतोड्याचा पेच पाच दिवसांनंतरही सुटलेला नसताना सेनगाव तालुक्यातील हाताळा हे गावदेखील विक्रीला निघाले आहे. शेतीसकट गाव विकत घेऊन इच्छामरणाची परवानगी द्या, अशी मागणी हाताळा येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून केली आहे.
ताकतोडा येथील आंदोलनाची धग कायम असतानाच हाताळ्याच्या ग्रामस्थांनी ही मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. ताकतोडा गावाप्रमाणेच याही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. बुधवारी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, आ. तानाजी मुटकुळे, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार जिवककुमार कांबळे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज भरण्यासाठी आलेले पत्र, पीकविमा काढलेल्या पावत्या दाखवून हक्काचा पीकविमा कसा मिळत नाही? असा सवाल केला. यावेळी उपस्थित बँक अधिकाऱ्याने गावात एकाही शेतकऱ्याला यावर्षी पीककर्ज दिले नाही, हे मान्य केले. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशीही संबंधित शेतकऱ्यांचे समाधान करु शकले नाहीत. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण कर्जमाफी, पीकविमा व नवीन पीककर्ज मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घेतली.
तरुणांनी केले मुंडण
ताकतोडा येथे शेतकऱ्यांचे पाच दिवसांनंतरही उपोषण सुरूच आहे. तरीही शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने गावकऱ्यांमध्ये संताप आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावातील काही तरुणांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला.