हतबल शेतक-याने मागितली इच्छामरणाची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:39 AM2020-12-30T04:39:55+5:302020-12-30T04:39:55+5:30
सेनगाव : तालुक्यातील वलाना येथील शेतकरी जमीन रस्त्याच्या वादातून हतबल झाला आहे. शासन पातळीवर न्यायाची अंमलबजावणी होत नाही. पोलीस ...
सेनगाव : तालुक्यातील वलाना येथील शेतकरी जमीन रस्त्याच्या वादातून हतबल झाला आहे. शासन पातळीवर न्यायाची अंमलबजावणी होत नाही. पोलीस अन्याय करणाऱ्या विरोधात कारवाई करीत नसल्याने प्रल्हाद किसन हेंबाडे या शेतक-याने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत कुटुंबासमवेत इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.
वलाना येथील शेतकरी प्रल्हाद किसन हेंबाडे यांची गट क्रमांक ५२० मध्ये ३८ आर जमीन आहे. या जमिनीकडे जाणारा रस्ता एका शेतक-याने अडविला आहे. सेनगाव तहसीलदार यांच्याकडे न्यायाची मागणी केली. यानंतर आदेश देऊन आम्हाला रस्ता खुला करून दिला आहे. परंतु संबंधित शेतकरी सातत्याने मला व पत्नीला मारहाण करीत आहेत. या विरोधात यापूर्वी दोनवेळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु संबंधित शेतकरी मात्र त्रास देत पत्नीला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. परंतु पोलीस यंत्रणा केवळ तक्रार अर्ज स्वीकारत असून, कारवाई करीत नाहीत. जिवाला धोका निर्माण झाला असून जिवंत जाळण्याचा धमक्या दिला जात असल्याचे तक्रार अर्जात नमूद आहे. पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने हतबल झालो आहोत. यामुळे जगणे असह्य झाले असल्याने आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.