द्वेष केल्याने माणूस माणसांपासून तुटतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:51 AM2019-01-22T00:51:37+5:302019-01-22T00:51:55+5:30
राग आल्यास ताबडतोब व्यक्त न होता विचार करुन व्यक्त होणे कधीही चांगले. रागात येऊन बोलल्याने माणूस माणसांपासून तुटतो. अशा वेळी विचार करुन व्यक्त झाल्यास त्यातून सकारात्मक परिणाम जाणवतात. त्या घटनेवर विचार केल्यास आपसात तेढ निर्माण होणार नाही, असे मत उद्योजक ज्ञानेश्वर मामडे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राग आल्यास ताबडतोब व्यक्त न होता विचार करुन व्यक्त होणे कधीही चांगले. रागात येऊन बोलल्याने माणूस माणसांपासून तुटतो. अशा वेळी विचार करुन व्यक्त झाल्यास त्यातून सकारात्मक परिणाम जाणवतात. त्या घटनेवर विचार केल्यास आपसात तेढ निर्माण होणार नाही, असे मत उद्योजक ज्ञानेश्वर मामडे यांनी व्यक्त केले.
उद्योग करताना व्यवहार नित्याचेच असतात. अनेकजण नकारात्मक बोलतात, ते बोल डोक्यात न ठेवता तेव्हाच काढून टाकलेले कधीही चांगले. एखादा नकारात्मक विचार जितका जास्त वेळ डोक्यात ठेऊ तितकी जास्त पीडा सहन करावी लागते. त्यामुळे नकारात्मक विचाराला जितक्या लवकर बाजूला सारले तितके प्रसन्न जीवन जगता येईल.
चूक प्रत्येकाकडून होते. चूक झाल्यास त्याला अपमानित न करता गोड शब्दात समजावून सांगितल्यास तो माणूस दुसऱ्यांदा ती चूक करत नाही. काम अधिक चांगले करण्याचा तो प्रयत्न करतो. पण चुकीबद्दल त्याला अपमानित केल्यास तो दुसºयांदा ते काम करण्यास धजावत नाही.
कोणत्याही बाबीचा शेवट कधीच नसतो. त्यावर विचार केल्यास त्यातून सकारात्मक परिणाम दिसून येतात. चर्चा करुन दोघांनी वाटाघाटी केल्यास संबंध अधिक दृढ होतात. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवून राग जिथल्या तिथे बाजूला सारून नव्या उमेदीने काम केल्यास जीवन अधिक समृद्ध जगता येते, असे स्वअनुभवातून वाटते.
रागात बोलल्याने अनेक वर्षे सोबत काम केलेला माणूस जेव्हा आपल्याला सोडून जातो तेव्हा अंत:करण अतिशय जड होते. नातेसंबंध जपण्यासाठी रागाचा त्याग करुन सर्वांशी गोड बोलने गरजेचे आहे. लोकमतचा गुड बोला, गोड बोला हा उपक्रम सर्वांनी अंगिकारण्याची गरज आहे.