स्वतःच्याच श्रद्धांजलीचे स्टेट्स ठेवत घेतला गळफास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 12:08 PM2022-11-28T12:08:20+5:302022-11-28T12:08:45+5:30
नवल जयराम नायकवाल (रा.कारेगाव, ता.सेनगाव) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : स्वतःच्याच श्रद्धांजलीचे स्टेट्स ठेवत एका २८ वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सेनगाव परिसरातील साई मंदिर परिसरात रविवारी सकाळी ६.३०च्या सुमारास उघडकीस आली. वडिलांच्या नावे असलेले कर्ज कसे फेडायचे? या चिंतेतून युवकाने हे टोकाचे पाऊल उचलले.
नवल जयराम नायकवाल (रा.कारेगाव, ता.सेनगाव) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याचे वडील जयराम नायकवाल यांनी पेरणीसाठी कर्ज घेतले होते. मात्र, अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडायचे, याची चिंता युवकास होती.
असे होते स्टेट्स
यातूनच शनिवारी घराबाहेर पडताना नवल याने स्वतःच्या स्टेट्सवर भावपूर्ण श्रद्धांजली नवल असा मजकूर ठेवला होता. मात्र, हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. रविवारी सकाळी सेनगाव येथील साई मंदिराच्या मागे असलेल्या बाभळीच्या झाडाला नवलचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला.