पोलीस ठाण्यात जाऊन भरोसा सेल करणार समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:23 AM2021-06-04T04:23:03+5:302021-06-04T04:23:03+5:30
हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तक्रारदार महिलेची गैरसोय होऊ नये, म्हणून त्या त्या पोलीस ठाण्यात जाऊन भरोसा सेलचे पथक समुपदेशन ...
हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तक्रारदार महिलेची गैरसोय होऊ नये, म्हणून त्या त्या पोलीस ठाण्यात जाऊन भरोसा सेलचे पथक समुपदेशन करणार आहे.
छोट्या छोट्या कारणावरून पती-पत्नीमधील वाद विकोपाला जाऊन संसाराची घडी विस्कटण्यापर्यंत प्रकरण जाते. अशा जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांचा संसार सुरळीत चालावा यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने भरोसा सेल स्थापन करण्यात आला आहे. येथील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील इमारतीत दररोज समुपदेशनाचे कार्य चालते. मात्र कोरोनामुळे या कार्याला मर्यादा येत होत्या. येथे येणाऱ्या तक्रारदार महिला व त्यांच्यासोबत येणारे नातेवाइकांची गर्दी लक्षात घेता कोरोना संसर्ग वाढीला आमंत्रण मिळत होते. त्यामुळे तक्रारदार महिलांची गैरसोय होऊ नये, यामुळे त्या त्या पोलीस ठाण्यात जाऊन समुपदेशन करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी भरोसा सेलच्या पथकाला दिल्या आहेत. त्यानुसार हे पथक आता तक्रारदार महिलांच्या परिसरातील पोलीस ठाण्यात जाऊन तेथे समुपदेशन करणार आहेत.
पाच महिन्यात ९३ जोडप्यांचा जुळविला संसार
येथील भरोसा सेलकडे जानेवारी ते मे २०२१ या काळात २३१ अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील ९३ प्रकरणात पती-पत्नीमधील वाद मिटविण्यात भरोसा सेलला यश आले आहे. तसेच ३० प्रकरणात कारवाई पत्र दिले असून १९ प्रकरणात कोर्टात जाण्याची समज देण्यात आली. तसेच १५ प्रकरणात संरक्षण अधिकाऱ्याकडे पाठविली आहेत.
मागील पाच महिन्यात ९३ प्रकरणात तडजोड करण्यात भरोसा सेलला यश आले आहे. आता कोरोनामुळे तक्रारदार महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून त्या त्या पोलीस ठाण्यात जाऊन भरोसा सेलचे पथक समुपदेशन करणार आहे.
- विशाखा धुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, भरोसा सेल
फोटो