‘आयुष्यमान’चे आरोग्य कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 12:14 AM2018-10-08T00:14:08+5:302018-10-08T00:14:28+5:30
गोरगरिबांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यासाठी शासनाकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी जिल्हा रूग्णालय व आरोग्य विभागातर्फे धडपड केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : गोरगरिबांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यासाठी शासनाकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी जिल्हा रूग्णालय व आरोग्य विभागातर्फे धडपड केली जात आहे. २३ सप्टेंबर रोजी योजनेचा शुभारंभ झाला असून आतापर्यंत जिल्ह्यातील १२७ जणांना ई- कार्डवाटप करण्यात आले आहेत.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे उद्घाटन २३ सप्टेंबर रोजी देशभरात झाले. योजने अंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील १ लाख ७ हजार २८ जणांना आरोग्य सेवेचा मोफत लाभ मिळणार आहे. यात ग्रामीण भागातील ९३ हजार ५७९ तर शहरी भागातील १३ हजार ४४९ लाभार्थ्यांचा यात समावेश आहे. विविध आजारांवर मोफत उपचार घेता येणार आहेत. कुटुंबातील पाच व्यक्तींपर्यंत हा लाभ देण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ एक वषार्साठी असून योजनेतंर्गत गरीब रुग्णांना मोठ्या खाजगी दवाखान्यात उपचार घेणे शक्य झाले आहे. संबधित रूग्णांना सांकेतांक क्रमांक
दिला जाणार आहे. तो क्रमांक सांगितल्यावर सदर लाभार्थ्यास भारतात कोठेही लाभ घेणे शक्य आहे. सदर क्रमांक सांगितल्यानंतर उपचार अथवा शस्त्रक्रियेचा लाभ मिळणार आहे. ही सेवा रूग्णालयात आॅनलाईन पद्धतीने राबविली जात आहे.
आयुष्यमान भारत जन आरोग्य योजने अंतर्गत कोणत्याही कुटुंबाना देशात कोठेही लाभ घेता येणार आहे. सर्वांना सांकेतिक क्रमांक देण्यात येणार आहे. क्रमांक सांगितल्यानंतर आवश्यक ते उपचार मिळण्यास मदत होणार आहे. योजनेतंर्गत वर्षातून एक वेळेस पाच लाख रुपयांपर्यंतचा लाभ वैद्यकीय उपचाराकरिता मिळणार आहे. या बरोबर कुटुंब प्रमुखास आयुष्यमान भारतचे कार्ड दिले जात आहे. हिंगोली येथील जिल्हा सामान्य रूग्णायात तसेच शहरातील स्नेहल नर्सींग होम व माधव हॉस्पीटल येथे सध्या नोंदणीचे काम सुरू असल्याचे डॉ. मोहसीन खान यांनी ‘लोकमत’ शी सांगितले.
हिंगोली : भारतात कुठेही उपचार घेणे शक्य
आयुष्यमान भारत योजने अंतर्गत कोणत्याही कुटुंबाला भारतात कोठेही या योजनेचा लाभ घेणे शक्य आहे. जिल्हा रूग्णालय, आरोग्य विभाग व आशावर्कर यांच्यामार्फत योजनेच्या जनजागृतीसाठी परिश्रम घेतले जात आहेत. शिवाय जिल्ह्यातील गावो-गावी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले होते.
सन २०११ मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार कुटुंबांची निवड आयुष्मान जन आरोग्य योजनेंतर्गत करण्यात आली आहे. योजनेमुळे हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ७ हजार २८ कुटुंबाना लाभ मिळणार.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची कामे सुरू असून लाभार्थ्यांची माहिती व कार्ड वाटप केली जात आहेत. अशी माहिती जि. शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले.