उन्हाचा पारा गेला ४0 अंशांच्या पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:10 AM2019-04-01T00:10:21+5:302019-04-01T00:11:12+5:30
यंदा आधीच दुष्काळी स्थिती असून उन्हाचा पाराही मार्च महिन्यातच ४0 अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे बाष्पीभवनानेही जलसाठ्यांतील पाणी कमी होत असून दुसरीकडे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : यंदा आधीच दुष्काळी स्थिती असून उन्हाचा पाराही मार्च महिन्यातच ४0 अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे बाष्पीभवनानेही जलसाठ्यांतील पाणी कमी होत असून दुसरीकडे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे.
यंदा पावसाने आॅगस्ट महिन्यापासूनच दगा दिला. या महिन्यात १९ आॅगस्टदरम्यान मोठ्या पावसाने हजेरी तर लावली. मात्र त्यानंतर सप्टेंबर, आॅक्टोबर पूर्णपणे कोरडे गेले. तरीही हिवाळ्याचा काळ मात्र लांबला होता. पार फेब्रुवारी महिन्यापर्यंत थंडीचा कडाका जाणवत होता. मार्चमध्ये वातावरण बदलले. हळूहळू सूर्य आग ओकत होता. आता ४0 अंश सेल्सियसच्या पुढे पारा सरकला आहे. दुपारच्या वेळी घराबाहेरही पडणे मुश्किल झाले आहे. त्याचा शेतीच्या कामांवरही परिणाम होत आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता लग्नसराई फारसी दिसत नाही. कदाचित निवडणुकांचाही परिणाम त्यावर झाला आहे. मात्र १८ एप्रिलला मतदान झाल्यानंतर प्रचारकार्य संपणार आहे. त्यानंतर लग्न समारंभांची रेलचेल वाढू शकते. परंतु टंचाईचा काळ लक्षात घेता अनेकांनी जानेवारी, फेब्रुवारीमध्येच विवाह सोहळे आटोपल्याचेही दिसत होते. त्यामुळे प्रवासातील या उन्हाच्या त्रासापासूनही वºहाडी मंडळींची मुक्तता करता आली.
मे महिन्यात तर लग्न समारंभांना उन्हासह पाणीटंचाईचाही फटका सोसावा लागू शकतो. रबीचे पीकही घेता आले नाही.
काही भागात आॅगस्टच्या पाण्यावरच तलाव भरले अन् त्यावर रबीचे पीक घेतले. मात्र इतरत्र वाळवंटासारखे ओसाड शेतशिवार आहेत.
मजुरांचेही मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे. लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरू झाला तरीही अजून हा मजूरवर्ग बाहेरच असल्याचे दिसत आहे.
अनेक ठिकाणी सेवाभावी वृत्तीतून काही सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळींनी पाणपोईची उभारणी केली असल्याचे दिसत आहे. या पाणपोईवर पूर्वीप्रमाणे आता माठ व पाणी वितरण करायला माणूस असे चित्र दिसत नाही. आता थंड पाण्याचे जार आणून ठेवले जात आहेत. काही ठिकाणीच जुन्या परंपरेप्रमाणे माठ आहेत. त्यात पाणी आणून टाकले जाते. मात्र जार ठेवणाऱ्यांना सरासरी २0 पेक्षा जास्त जार ठेवावे लागत आहेत. निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या दिवशी तर २0 जार दुपारीच संपले होते. पुन्हा तेवढेच मागण्याची वेळ आली होती.
यंदाच्या उन्हाळ्यात सोसाट्याचा वारा व वावटळींचा मोठा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच रस्त्यांची कामे सुरू असल्याने धुळीच्या लोटांनी जनता नैसर्गिक कारणानेच हैराण झाली आहे.