उन्हाचा तडाखा कायम, हिंगोलीत उष्माघाताने एकाचा मृत्यू
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: June 21, 2023 05:43 PM2023-06-21T17:43:06+5:302023-06-21T17:43:34+5:30
तांदूळवाडी शिवारातील वन विभागाच्या जंगलात आढळला मृतदेह
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील तांदूळवाडी शिवारात एका मानसिक रूग्णाचा उष्माघातानेमृत्यू झाला. ही घटना २० जून रोजी रात्री ७:२० वाजता उघडकीस आली. याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली.
चंद्रकांत बळीराम वाव्हळ (वय ५५ रा. म्हाळसापूर ता. सेनगाव) असे उष्माघातानेमृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या डोक्यावर परिणाम असल्याने एक वर्षापूर्वी अकोला येथील डॉक्टरांकडे उपचार करण्यात आले होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या सुरू होत्या. याच मानसिक लहरीमध्ये १४ जून रोजी ते घरातून निघून गेले होते. मात्र २० जून रोजी तांदूळवाडी शिवारातील वन विभागाच्या जंगलात एका पळसाच्या झाडाजवळ त्यांचा मृतदेह आढळला. त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असल्याचे पोलिसांना दिलेल्या खबरीत म्हटले आहे. याप्रकरणी विनोद चंद्रकांत वाव्हळ (रा. म्हाळसापूर) यांच्या खबरीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली. पोलिस अंमलदार आर.जी. जाधव तपास करीत आहेत.
जिल्ह्यातील तापमान ३८ अंशावर
जून महिना संपत आला तरी अजूनही सूर्य अजूनही आग ओकत आहे. सध्या जिल्ह्यातील कमाल तापमान ३८ अंशावर पोहचले आहे. सकाळपासून उन्हाचे चटके बसत असून दुपारी घराबाहेर पडण्याचे नागरिक टाळत आहेत.