जिल्हाभरात जोरदार पाऊस; शेतकरी सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:19 AM2021-07-12T04:19:18+5:302021-07-12T04:19:18+5:30
हिंगोली : पंधरा दिवसांच्या खंडानंतर दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी जिल्हाभरात सर्वदूर जोराचा पाऊस झाला. विजांच्या ...
हिंगोली : पंधरा दिवसांच्या खंडानंतर दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी जिल्हाभरात सर्वदूर जोराचा पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे नदी, नाल्यांना पाणी आले होते. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता.
जिल्ह्यात शनिवारी रात्री काही तास पाऊस झाला. रविवारी पुन्हा सकाळपासून ११ वाजल्यापासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी कडक ऊन पडले होते. त्यानंतर मात्र औंढा तालुक्यातील येहळेगाव (सोळंके), वसमत तालुक्यातील दारेफळ, आदी शिवारात पावसास सुरुवात झाली. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास औंढा येथेही मुसळधार पावसास सुरुवात झाली. वसमत तालुक्यातील जवळाबाजार येथेही अधून-मधून पाऊस सुरूच होता. तसेच कौठा शिवारातही सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. कळमनुरीसह तालुक्यातील जवळा पांचाळ, दांडेगाव, आदी भागातही जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस सुरू असताना हिंगोलीत मात्र सायंकाळी सातपर्यंत म्हणावा तेवढा पाऊस नव्हता. त्यानंतर सात वाजता मुसळधार पावसास सुरुवात झाली. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पहिल्यांदाच जोराचा पाऊस झाल्याने नाले ओसंडून वाहत होते. तसेच ओढ्यालाही पाणी आले होते. दरम्यान, शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे कयाधू नदी दुथडी भरून वाहत होती. रविवारी रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, शेवटच्या घटका मोजत असलेल्या पिकांनाही जीवदान मिळाले आहे.
फोटो कयाधू नदी नांदापूर