Video: जलप्रकोप! हिंगोलीतील अख्खे कुरुंदा गाव पाण्याखाली; आश्रयासाठी ग्रामस्थांची धावाधाव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 07:23 AM2022-07-09T07:23:49+5:302022-07-09T07:29:11+5:30
कुरुंदा गाव पाण्याखाली: 2016 ची झाली पुनरावृत्ती
- इब्राहिम जहागीरदार
कुरुंदा ( जिल्हा हिंगोली) : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गावात पाणी घुसले असून हजारो घरांचे नुकसान झाले आहे. गुरे वाहून गेली, वाहने वाहून गेली तर गाव सकाळी सात वाजेपर्यंत पाण्याखालीच असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे गावाजवळून आसना नदी वाहते. या नदीला संरक्षक भिंत आणखी उंचीची करण्याची मागणी आहे. मात्र ती काही झाली नाही गावात पुराचे पाणी शिरण्याचा प्रकार यामुळे घडतो. मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास असे घडत असल्याने प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नव्हते. 2016 मध्ये कुरुंदा गाव पाण्याखाली गेले होते, तेव्हाही करोडो रुपयांची हानी झाली होती. यावेळीही तीच परिस्थिती उद्भवली आहे. अनेकांची घरे पडली गुरे वाहून गेली शेतातील पिके वाहून गेली. आखाड्यावरील साहित्य वाहून गेले एवढेच काय तर गावामध्ये रस्त्यावर लावलेली वाहनही वाहून गेली. काहींची वाहने एकमेकाला अडकून नदी नजीकच्या रस्त्यावर आढळून आली.
जुनी मातीची घरे पडल्याने मोठे नुकसान झाले. नदीला अचानक पूर आल्याने काही जणांची गुरे गोठ्यातच मरून पडली. बकऱ्या, कोंबड्याही मोठ्या प्रमाणात बळी गेला. या प्रकारामुळे काही जणांना रात्र जागून काढावी लागली आहे आज सकाळी सुद्धा गावातील अनेक रस्त्यावर कमरे इतके पाणी असल्याने नागरिकांना पाण्याखाली गेलेले संसार सावरण्यासाठी काहीच करता येत नसल्याचे दिसून येत होते.
VIDEO: मुसळधार पावसाने हाहाकार, हिंगोलीतील कुरुंदा गाव पाण्याखाली; आश्रयासाठी ग्रामस्थांची धावाधाव pic.twitter.com/XvS9p3ZVTr
— Lokmat (@lokmat) July 9, 2022
मिळेल तेथे घेतला आश्रय
कुरुंदा गावात रात्री दोन वाजेपासून पुराचे थैमान सुरू होते जिकडे तिकडे हाहाकार पसरला होता. एक मजली घर असलेल्यांना जीव वाचवायचा कसा? असा प्रश्न पडला होता घरात पाणी घुसले रस्त्यावर वेगाने पाणी वाहत होते त्यामुळे कोणी शेजाऱ्याकडे दुसऱ्या मजल्यावर आसरा घेतला. तर काहींनी उंच भागातील शाळा ग्रामपंचायत इमारत आधी ठिकाणी आश्रय घेतल्याचे चित्र आहे.