बोलघेवडेपणा व टिंगलटवाली सोडून मदत करा; देवेंद्र फडणवीसांनी सरकारला फटकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 02:49 PM2020-10-21T14:49:51+5:302020-10-21T14:52:14+5:30
शेती दुरूस्त करण्यासाठीही पैसा नाही, अशा परिस्थितीत सरकार मदत न करता टोलवा-टोलवी सुरू आहे.
वसमत : अतिवृष्टीने शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत. शेती व शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झालेले असताना सरकारतर्फे कोणती मदत नाही, पंचनामे होत नाहीत, बोलघेवड्याचे सरकार आहे. मिडीयासमोर टिंगल टवाली व बोलघेवडेपणा करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करण्यावर लक्ष द्या, अशा भाषेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला फटकारले आहे. वसमत तालुक्यात त्यांनी नुकसान पाहणी दौरा केला.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वसमत तालुक्यातील आडगाव रंजे शिवारात आले होते. त्यांनी शेती बांधावर जावून पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या समोर व्यथा मांडल्या. यावेळी बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरले. अतिवृष्टीने शेतकरी होरपळला आहे. पिकांसह शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शेती दुरूस्त करण्यासाठीही पैसा नाही, अशा परिस्थितीत सरकार मदत न करता टोलवा-टोलवी सुरू आहे.
शेतकऱ्यांना मदत देणे तर दूर उलट बँका वसुलीसाठी तगादा लावत आहेत. सरकारने किमान वसुली तरी थांबवावी, कर्ज वसुलीचा तगादा लावणाऱ्याच्या विरोधात गुन्हे नोंदवण्याची मागणी त्यांनी केली. मन हेलावणारे शेती पिकांचे नुकसान आहे आहे. तरीही सरकार जागे होत नाही, पंचनामे करत नाही, पाहणीसाठीही अद्याप कोणी आले नाही. पालकमंत्रीही वसमत तालुक्यात आले नाहीत. शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. शासनकर्ते गंभीर नाहीत, त्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचे गांभीर्यच नाही. दररोज मिडीयामध्ये येतात. टिंगलटवाळी करून टोलबाजी करतात. परंतु सरकारने हा बोलघेवडेपणा सोडूान शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीचे बघा तरच शेतकरी सुखी होईल नसता, तुम्हाला माफ करणार नाहीत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला सुनावले.
शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घेण्याचे गांभीर्यच राज्यकर्त्यामध्ये नाही. बोलणारेच जास्त झालेत, निर्णय घेणारे कोणी राहिले नाहीत. असा टोलाही त्यांनी लगावला. टोलेबाजी सोडून शेतकऱ्यांना त्वरीत मदत द्या, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांच्या सोबत माजी मंत्री पंकजा मुंडे, आ.तान्हाजी मुटकुळे, गजानन घुगे, शिवदास बोड्डेवार, श्रीकांत देशपांडे, रामराव वडकुते,उज्वला तांभाळे, नाथराव कदम यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.