हेमंत पाटलांमुळेच बंडखोरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:11 AM2019-03-30T00:11:43+5:302019-03-30T00:12:44+5:30
अपक्ष म्हणून मैदानात राहावे, असा आग्रह हेमंत पाटील यांचाही होता, असे सांगत बंडखोर उमेदवार अॅड. शिवाजी जाधव यांनी आपली तलवार म्यान केली. याबाबत अनेकांचे फोन व मेसेज होते, असे सांगत जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. जाधवांच्या या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत(जि.हिंगोली) : अपक्ष म्हणून मैदानात राहावे, असा आग्रह हेमंत पाटील यांचाही होता, असे सांगत बंडखोर उमेदवार अॅड. शिवाजी जाधव यांनी आपली तलवार म्यान केली. याबाबत अनेकांचे फोन व मेसेज होते, असे सांगत जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. जाधवांच्या या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.
हिंगोलीत शिवसेनेच्या वतीने डॉ. जयप्रकाश मुंदडा यांना उमेदवारी निश्चित झाल्याची अगोदर चर्चा होती. त्यामुळे त्यांच्यासाठीच जाधव यांच्या रुपाने खड्डा खोदण्याचे काम केले जात होते, अशी चर्चा रंगत होती. त्यातूनच जाधव अपक्ष राहण्यास तयार झाले. मात्र नाट्यमय घडामोडीत सेनेचे तिकीट हेमंत पाटील यांना जाहीर झाले. त्यामुळे सर्व चित्र बदलले. हेमंत पाटील जर उमेदवार नसते तर जाधव यांना अपक्ष राहण्यास त्यांचा पाठिंबा राहिला असता का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
विधानसभेसाठी मीच उमेदवार
लोकसभा निवडणुकीसाठी भरलेला अपक्ष अर्ज मागे घेत असलो तरी विधानसभेसाठी मी उमेदवार राहीनच, असा सूचक इशारा देत जाधव यांनी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली. यावेळी मंत्री अर्जून खोतकर यांची उपस्थिती होती. शुक्रवारी खोतकर, संपर्क प्रमुख आनंद जाधव, उमेदवार हेमंत पाटील हे वसमत येथे जाधव यांची भेट घेण्यास आले होते. त्यांच्याशी चर्चा झाल्यावर जाधव यांनी वरील घोषणा केली.
... म्हणून माघार -वडजे
मी मराठा समाजाच्या काही संघटनांचा प्रमुख या नात्याने निवडणूक लढायची तयारी केली होती. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उमेदवार हेमंत पाटील यांनी मतविभागणी होऊ नये, यासाठी माघारीची विनंती केली. त्यानुसार माघार घेतल्याचे मनीष वडजे यांनी सांगितले.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातून अॅड. जाधव यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र ते ऐकत नव्हते. शेवटी मुलाच्या सोयरिकीसाठी पुण्याला जायचे असतानाही राज्यमंत्री खोतकर यांना मुख्यमंत्र्यांनी वसमतला पाठविले. अॅड. शिवाजी जाधव यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर जाधव यांनी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली. तेव्हा जाधव यांनीही उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांनी मोठी जबाबदारी देण्याचे आश्वासन दिल्याचे नंतर पत्रकारांना सांगितले.
अॅड.शिवाजी जाधव म्हणाले, ते वाक्य स्लीप आॅफ टंग होते. मला तसे म्हणायचे नव्हते. हेमंत पाटील यांचा नव्हे, कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र बोलण्याच्या ओघात चुकीने त्यांचे नाव तोंडात आले.
त्यांना तसे म्हणायचे नव्हते-पाटील
ते भाषणात बोलले मात्र त्यांना तसे बोलायचे नव्हते. त्यांच्या बोलण्याचा ‘तसा’ अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया हेमंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. विशेष असे की, अॅड. जाधव यांनी ‘ते’ वाक्य उच्चारताच मंचावर असलेले संपर्क प्रमुख आनंद जाधव व त्यांच्या शेजारी बसलेल्यांमध्ये यावरून कुजबूज झाल्याचेही सर्वांनी पाहिले. यावरून शिवसेनेत सर्व काही आलबेल नव्हते, हे समोर आले आहे.