हिंगोलीतील कृष्णापुरातील कोंबड्यांचाही मृत्यू बर्ड फ्लूमुळेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 12:49 PM2021-01-28T12:49:50+5:302021-01-28T12:51:12+5:30
bird flu news आखाडा बाळापूर नजीकच्या धांडे पिंपरी येथे बर्ड फ्लूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले. तेथील सर्व कोंबड्या नष्ट केल्या. त्याच दरम्यान कृष्णापूर येथीलही काही कोंबड्या मरण पावल्या होत्या.
आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : कृष्णापूर येथील कोंबड्यांनाही बर्ड फ्लूची बाधा झाली असून, त्यांचा मृत्यूही बर्ड फ्लूच्या साथीने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कृष्णापुरातील कोंबड्यांचा पशुसंवर्धन विभागाने दयामरणासाठी शोध घेतला. परंतु कृष्णापुरातील कोंबड्या ‘फरार ’ झाल्याचे चित्र आहे. तरीही ११८ कोंबड्या पकडून त्यांना दयामरण देण्यात आले आहे.
आखाडा बाळापूर नजीकच्या धांडे पिंपरी येथे बर्ड फ्लूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले. तेथील सर्व कोंबड्या नष्ट केल्या. त्याच दरम्यान कृष्णापूर येथीलही काही कोंबड्या मरण पावल्या होत्या. तब्बल १२० कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. २६ जानेवारी रोजी सायंकाळी उशिरा प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला असून, कृष्णापूर येथील कोंबड्यांचा मृत्यूही बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक कृष्णपुरात धडकले.
पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. माधव आठवले, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रणिता पेंडकर, डॉ. जावळे यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या पथकाने कृष्णापूर येथील घरोघरी जाऊन कोंबड्यांचा शोध घेतला. परंतु दोन दिवसांपूर्वीच सर्वेक्षण केले असता, येथे २५३ कोंबड्या होत्या. परंतु आज प्रत्यक्षात केवळ ११८ कोंबड्याच पथकाच्या हाती लागल्या आहेत. पथकाची चाहुल लागताच कृष्णापूरच्या कोंबड्या ‘फरार’ झाल्याची चर्चा जोरात रंगली आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ११८ कोंबड्यांना २७ जानेवारी रोजी दयामरण देण्यात आले आहे. आता आखाडा बाळापूरच्या दोन्ही बाजूने बर्ड फ्लू झाल्याचे सिद्ध झाले असून, नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. बर्ड फ्लूची साथ आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. माधव आठवले यांनी केले आहे. कृष्णापूर गावाच्या त्रिज्येतील एक किलोमीटर अंतरातील सर्व कोंबड्या नष्ट करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
घराला कुलूप लावून पशुपालक गायब
कृष्णापूर येथे एक किलोमीटर अंतरातील कोंबड्या शोधून त्यांना दया मरणासाठी घेऊन जाणारे पथक चौफेर फिरत असताना काही पशुपालकांनी मोठी चतुराई दाखवली. कोंबड्या घरात कोंडून घराला कुलूप लावून ते गायब झाले. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या पथकाला काही घरातून रिकाम्या हाताने परत जावे लागले.
पोलिसांना पाचारण केल्यानंतर काहींनी कोंबड्या दिल्या
कृष्णापूर येथे बर्ड फ्लूची साथ लागल्याने एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचे काम सुरू होते. परंतु काही जणांनी आमच्या कोंबड्या ठणठणीत आहेत, असे सांगत कोंबड्या देण्यास नकार दिला. अखेर पशुसंवर्धन विभागाने पोलिसांना पाचारण केल्यानंतर काहीजणांनी कोंबड्या दिल्या. नागरिकांनी अशी आडमुठी भूमिका घेत साथरोग प्रतिबंध करण्यास अडथळा निर्माण केल्यास व कोंबड्या देण्यास नकार दिल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असे पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. माधव आठवले यांनी सांगितले.