अहो सरकार! तुम्हीच सांगा, पाचशे-हजार रुपयांत कसे जगायचे? ईपीएस ९५ पेन्शनधारकांची व्यथा
By रमेश वाबळे | Updated: March 11, 2024 19:33 IST2024-03-11T19:32:47+5:302024-03-11T19:33:30+5:30
सहकार खाते, राज्य विद्युत मंडळ, एसटी महामंडळ, साखर कारखाने, बिडी कामगार यासह विविध महामंडळांत सेवा बजावलेल्या पेन्शनधारकांना तुटपुंजी पेन्शन मिळते.

अहो सरकार! तुम्हीच सांगा, पाचशे-हजार रुपयांत कसे जगायचे? ईपीएस ९५ पेन्शनधारकांची व्यथा
हिंगोली : एकीकडे महागाईने कळस गाठला असताना ईपीएस ९५ पेन्शनधारकांना मात्र ५०० ते २ हजार २०० रुपये पेन्शन मिळते. या तुटपुंजा पेन्शनमध्ये जीवन जगणे अवघड झाले असून, सरकारने पेन्शनवाढ करावी, या मागणीसाठी ११ मार्च रोजी ईपीएस ९५ पेन्शनधारकांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
सहकार खाते, राज्य विद्युत मंडळ, एसटी महामंडळ, साखर कारखाने, बिडी कामगार यासह विविध महामंडळांत सेवा बजावलेल्या पेन्शनधारकांना तुटपुंजी पेन्शन मिळते. महागाईच्या काळात हाती येणाऱ्या पेन्शनवर जीवन जगणे शक्य होत नाही. त्यामुळे उतारवयात काम करण्याची वेळ पेन्शनधारकांवर आली आहे. सध्या पेन्शनधारकांना ५०० रुपये, ७०० रुपये, ९०० रुपये ते २ हजार २०० रुपये एवढी पेन्शन मिळते. पेन्शनवाढ मिळावी, यासाठी पेन्शनर्सच्या वतीने अनेकवेळा आंदोलने करण्यात आली. दिल्लीतही शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन प्रश्न मांडला.
परंतु, पेन्शनवाढीचा प्रश्न निकाली निघाला नाही. त्यामुळे पेन्शनधारकांत नाराजीचा सूर उमटत असून, लोकसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याअगोदर पेन्शनवाढ करावी, मागणीसाठी ईपीएस ९५ पेन्शनधारकांनी धरणे आंदोलन केले. यावेळी घोषणाही देण्यात आल्या. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत श्रम व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांना देण्यात आले. यावेळी मारोजी चव्हाण, सुभाष अपूर्वा, जेजेराम ढोक, महंमद गौस, ए. डी. पाईकराव, पी. आर. कोटकर, डी. पी. नरवाडे, गफार खान, आर. बी. अंभोरे, भीमराव मार्कड, शेख रसूल, समीउल्लाखाँ, एस. के. काशिदे आदींची उपस्थिती होती.