हिंगोली जिल्ह्यात चोरट्यांचा हैदोस; ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:50 AM2018-11-11T00:50:45+5:302018-11-11T00:51:07+5:30
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ऐन सणासूदीत चोरट्यांनी हैदोस घातला आहे. दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी गेलेल्यांची घरे चोरट्यांनी फोडून लाखोंचा ऐवज तसेच सोने-चांदीचे दागिने लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. हिंगोली शहरालगतच्या गारमाळ परिसरात तसेच बासंबा येथे व कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथेही भरदिवसा धाडसी चोरी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ऐन सणासूदीत चोरट्यांनी हैदोस घातला आहे. दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी गेलेल्यांची घरे चोरट्यांनी फोडून लाखोंचा ऐवज तसेच सोने-चांदीचे दागिने लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. हिंगोली शहरालगतच्या गारमाळ परिसरात तसेच बासंबा येथे व कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथेही भरदिवसा धाडसी चोरी झाली.
दिवाळी सणानिमित्त अनेकजण बाहेरगावी गेल्याने चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड तसेच सोने चांदीचे असा लाखोंचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी विविध ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हिंगोली शहरालगतच्या गारमाळ परिसरातील गंगूबाई रमजान चौधरी यांच्या घराचे चोरट्यांनी कूलूप तोडून सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बासंबा येथेही चोरीच्या घटना
४बासंबा : येथील नवी आबादीत चोरीची घटना घडली. केशव घुगे यांच्या घरातून २ लाखांची रोकड व २ लाख ७२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. तसेच बन्सी घुगे यांच्या घरातून ५ हजारांची रोकड व ५२ हजारांचे सोन्याचे दागिने तर ज्ञानेश्वर पाटनकर यांच्या घरातून ९ हजाराचा दिड क्विंटल कापूस चोरट्यांनी लंपास केला. एकूण ५ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
वारंगा फाटा येथे भर दिवसा धाडसी चोरी; रोकड, दागिने लंपास
४वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील भवानी नगरमध्ये दोन घरांमध्ये भरदिवसा धाडसी चोरी करून ३ लाख ८८ हजार ८00 रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील डॉ. पांडुरंग मारोतराव हेंद्रे यांची पत्नी व मुले दिवाळी सणानिमित्त माहेरी गेले होते. ९ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे डॉक्टर हेंद्रे वारंगा फाटा येथे सकाळी १० वाजता दवाखान्यात वैद्यकीय सेवेसाठी गेले. या संधीचा चोरट्यांनी फायदा घेत सोने-चांदी व रोख रक्कम चोरून डल्ला मारला. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरी परत आले असता गेटचे कुलूप, मुख्य दरवाजाची कडी व कपाट उघडले असता लॉकर तोडलेले त्यांना दिसले. कपाटातील दागिने व रोख रकमेची पाहणी केली असता त्यातील विविध प्रकारचे सोन्याचे ३ लाख १३ हजार ८00 रुपयांचे दागिने व १५ हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. दरम्यान, शेजारीच असलेले ओमकार किशनराव वंजे यांच्याही घराचे कुलूप तोडून लॉकरमधील ७५ हजार ८00 रुपयांचे सोन्याचे दागिने व ६० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याचे समजले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच बाळापूर ठाण्याचे पोनि व्यंकटेश केंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी ठसेतज्ञ व श्वानपथकास पाचारण केले. परंतु त्या ठिकाणी श्वानास कुठलाही माग लागला नाही. डॉ. पांडुरंग हेंद्रे यांच्या फियार्दीवरून बाळापूर ठाण्यात धाडसी चोरीच्या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोनि व्यंकटेश केंद्रे करीत आहेत. मागील काही वर्षांपासून वारंगा फाटा येथे दुकानांमध्ये चोºयांचे घटना घडल्या होत्या. परंतु चोरींच्या घटना रात्रीच्या वेळी घडल्या होत्या. मात्र आता भरदिवसा चोरट्यांनी केलेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरीच्या घटनेचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.