स्पर्धा परीक्षेत अपयश आल्याने उच्च शिक्षित तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 04:09 PM2019-05-28T16:09:46+5:302019-05-28T16:11:23+5:30
तरुण तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.
हिंगोली : शहरातील सुराणा नगर भागात मंगळवारी ( दि. २८) सकाळच्या सुमारास एका उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. स्पर्धा परीक्षेतून आलेल्या अपयशामुळे या तरुणाने आत्महत्येचे पाऊल उचललेले आहे.
हिंगोली तालुक्यातील सावरखेडा येथील दिलीप बळीराम हरणे (२६) ह.मु. सुराना नगर हिंगोली हा मागील तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. स्पर्धा परीक्षेत दोन वेळा अपयश आल्याने तो तणावाखाली होता. त्याने नांदेड शहरातील एका स्पर्धा परीक्षेचे शिकवणी वर्गही लावले होते. तो मागील काही दिवसांपासून कुणाशीही बोलत नसे. नातेवाईक त्याला बोलण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याचे बोलणे कमी झाले होते. दरम्यान त्याने अचानक राहत्या घरात आत्महत्येचे पाऊल उचलले. माहिती मिळताच घटनास्थळी हिंगोली ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हासामान्य रुग्णालयात हलविला. याप्रकरणी अद्याप कोणतीही नोंद झालेली नाही.