जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:35 AM2021-09-24T04:35:04+5:302021-09-24T04:35:04+5:30
हिंगोली : कोरोना महामारीची तिसरी लाट लक्षात घेता जिल्ह्यातील १६७ आरोग्य केंद्रांवर गुरुवारी सर्वाधिक लसीकरण नागरिकांनी करून घेतले. जिल्हाधिकाऱ्यांनी ...
हिंगोली : कोरोना महामारीची तिसरी लाट लक्षात घेता जिल्ह्यातील १६७ आरोग्य केंद्रांवर गुरुवारी सर्वाधिक लसीकरण नागरिकांनी करून घेतले. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे. प्रारंभी कोविशिल्ड व कोवॅक्सिन असे दोन्ही लसींचे डोस साडेपाच लाख एवढे आले होते. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी लोकप्रतिनिधी, सर्व कार्यालयांचे विभागप्रमुख व नागरिकांना लसीकरण करून घेण्यासंदर्भात आवाहन केले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत २३ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजेपर्यंत २० हजार नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. आजमितीस जिल्ह्यात ३५ हजार जवळपास दोन्ही लसींचे डोस शिल्लक आहेत. ही लसीकरण मोहीम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
वेळात वेळ काढून लसीकरण करावे
कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता नागरिकांनी वेळात वेळ काढून लसीकरण करावे. लसीकरणाच्या ठिकाणी जातेवेळेस किंवा बाजारपेठेत वस्तू करायला जातेवेळेस मास्क, सामाजिक अंतर व सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. लसीकरणाच्या बाबतीत कोणीही हयगय करू नये. ग्रामीण भागातील नागरिकही लसीकरणाला प्रतिसाद देत आहेत.
-डॉ. सचिन भायेकर, जिल्हा लसीकरण अधिकारी
शहरात दोन नवे लसीकरण केंद्र
महिनाभरापासून शहरातील कल्याण मंडपम येथे एकच केंद्र कार्यरत होते. यामुळे नागरिकांना रांगेत उभे राहून लसीकरण करावे लागत होते. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सिद्धार्थनगर व अण्णाभाऊ साठे सभागृह येथे नव्याने दोन लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.