सालापूर येथील मतदान केंद्रावर सर्वाधिक मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:26 AM2021-01-17T04:26:03+5:302021-01-17T04:26:03+5:30
तालुक्यातील सर्वात कमी मतदान आखाडा बाळापूर येथील छत्रपती शाहू विद्यालय येथील खोली क्रमांक ३ मधील मतदान केंद्रावर ४९.०५ टक्के ...
तालुक्यातील सर्वात कमी मतदान आखाडा बाळापूर येथील छत्रपती शाहू विद्यालय येथील खोली क्रमांक ३ मधील मतदान केंद्रावर ४९.०५ टक्के मतदान झाले. निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ७८.८३ टक्के मतदान झाले होते. यावर्षीच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. ९० ग्रामपंचायतींसाठी ६२ हजार १७७ पुरुष, ५६ हजार ६८१ महिला असे एकूण १ लाख १८ हजार ८५८ मतदार होते. त्यापैकी ५० हजार ६०४ पुरुष व ४४ हजार ६८६ महिला असे एकूण ९५ हजार २९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदानाची टक्केवारी ८०.१७ टक्के आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान झाले. मतमोजणी १८ जानेवारी रोजी तहसील कार्यालयात होणार आहे. तालुक्यातील सेलसुरा येथील खोली क्रमांक ३ मध्ये ९४.५८ टक्के, सालापूर येथील खोली क्रमांक २ मध्ये ९५.२४ टक्के, सालापूर येथील खोली क्रमांक ३ मध्ये ९४.०५ टक्के मतदान झाले. कळमकोंडा येथे ९४.१२ टक्के मतदान झाले. ९० टक्क्यांच्यावर अनेक ग्रामपंचायतीमध्ये मतदान झाले आहे. तालुक्यात २७५ मतदान केंद्रे असून त्यापैकी १९ मतदान केंद्रे संवेदनशील होती. या संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.
२५ टेबलवर होणार मतमोजणी
कळमनुरी तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. तहसील कार्यालयात १८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेपासून २५ टेबलवर मतमोजणी होणार आहे. १३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. मतमोजणीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पर्यवेक्षक सहाय्यक पर्यवेक्षक यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. २५ टेबलद्वारे ११ फेऱ्यांतून मतमोजणी होणार आहे. मतमोजणी कक्षात उमेदवार अथवा त्याच्या प्रतिनिधीला प्रवेशाची मुभा राहणार आहे. तालुक्यात २७५ मतदान केंद्र असून पहिल्या फेरीत २५ मतदान केंद्राची व त्यानंतर उर्वरित मतदान केंद्रावरील मतदानाची मतमोजणी होणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती तहसीलदार दत्तू शेवाळे, नायब तहसीलदार प्रवीण ऋषी यांनी दिली.