Hingili: हिंगोलीत ५१ फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन, नेत्रदीपक आतषबाजीने उजळले रामलीला मैदान
By विजय पाटील | Published: October 25, 2023 12:23 AM2023-10-25T00:23:40+5:302023-10-25T00:24:10+5:30
Hingoli Ravan Dahan: भारतातील म्हैसूरनंतर दुसऱ्या क्रमांकाचा समजल्या जाणारा हिंगोलीच्या दसरा महोत्सवात विजया दशमीच्या दिवशी रात्री ११:४१ वाजता ५१ फुटी रावण पुतळ्याचे दहन करण्यात आले.
हिंगोली - भारतातील म्हैसूरनंतर दुसऱ्या क्रमांकाचा समजल्या जाणारा हिंगोलीच्या दसरा महोत्सवात विजया दशमीच्या दिवशी रात्री ११:४१ वाजता ५१ फुटी रावण पुतळ्याचे दहन करण्यात आले. यादरम्यान करण्यात आलेल्या नेत्रदिपक आतषबाजीने रामलीला मैदान उजळले होते. या कार्यक्रमास जिल्ह्यासह परजिल्ह्यातील हजारों नागरिकांनी हजेरी लावली होती.
सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने १६९ व्या दसरा महोत्सवाचे आयोजन शहरातील रामलीला मैदानावर करण्यात आले. यानिमित्त कृषी व औद्योगिक प्रदर्शनी भरविण्यात आली असून धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमांसह विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण रावण दहनाचा कार्यक्रम विजयादशमीच्या दिवशी २४ ऑक्टोबर रोजी रात्री ११:४१ वाजता घेण्यात आला. यावेळी आ.तान्हाजी मुटकुळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड, खाकीबाबा मठाचे महंत कौशल्यदास महाराज, मुख्याधिकारी अरविंद मुंडे, यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.
रावन दहणाचा कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामीण भागातील नागरीक दुपारपासून रामलीला मैदानात दाखल होत होते. रात्री १० च्या सुमारास मैदानावर हजारोंच्या संख्येने नागरीक जमले होते. यादरम्यान रामलीला मंचवर आयोजित रामलीला कार्यक्रमात प्रभू श्रीराम व रावण युद्धाचा प्रसंग सादर करण्यात आला. त्यानंतर नेत्रदिपक आतषबाजी व रावण दहनाचा कार्यक्रम पार पडला.