हिंगोलीत वर्षभरात वीजेचा धक्का लागून १४ गतप्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 04:06 PM2019-07-05T16:06:11+5:302019-07-05T16:12:34+5:30
अचानक वीजेचा शॉक लागुन मृत्यू ओढवल्यास मयताच्या कुटुंबियांना महावितरणकडून आर्थिक मदत जाहिर केली जाते.
हिंगोली : पावसाळ्यात विद्युत अपघातामुळे जीवित व वित्तहानीच्या वाढत्या घटना ही चिंताजनक बाब बनली आहे. विद्युत अपघात टाळण्यासाठी सर्वांनीच सावधानता बाळगणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा वीज उपकरणे हाताळताना हयगयी केली जाते. शिवाय महावितरणच्या बेजबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेही अनेक दुर्घटना घडतात. त्यामुळे वीजेचा शॉक लागून मृत्यू होतो.
जिल्ह्यामध्ये एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत १४ जणांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. तर विविध घटनेत ५ जनावरे दगावल्याची नोंद महावितरण दरबारी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकाने घरात, शेतात विद्युत उपकरणे हाताळताना सावधानता बाळगावी असे आवाहन केले जात आहे. वादळी वाऱ्यामुळे पावसाळ्यात वीजेच्या तारा तुटणे, खांब वाकणे, पडणे, रोहित्र वाकणे वा पडणे, वीजतारांवर झाड किंवा झाडांची फांदी तुटून पडणे अशा घटना घडतात. अशावेळी महावितरणने वेळीच खबदारी घेऊन दुरूस्तीचे कामे हाती घेणे आवश्यक आहे. तसेच पाऊस चालु असताना रोहित्र, खांबाजवळ किंवा वीजतारांखाली थांबणे टाळले पाहिजे.
अचानक वीजेचा शॉक लागुन मृत्यू ओढवल्यास मयताच्या कुटुंबियांना महावितरणकडून आर्थिक मदत जाहिर केली जाते. परंतु ही प्रक्रिया किचकट असल्याने अनेकांना याचा लाभ मिळत नाही. किंवा यात बराच कालावधी जाते. घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मयताचे कुटुंब उघड्यावर येते. अशावेळी महावितरण प्रशासनाने वेळोवेळी दखल घेणे गरजेचे असून तशी मागणीही नागरिकांतून केली जात आहे.