हिंगोलीत आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 01:47 PM2018-08-06T13:47:44+5:302018-08-06T13:48:41+5:30
धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आज हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल धनगर समाजबांधवातर्फे एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
हिंगोली : धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आज हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल धनगर समाजबांधवातर्फे एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे . शासनाने निवडणुकी पूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे आता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व धनगर समाजाला आरक्षण देऊन त्याची अमंलबजावणी करावी या मागणीसाठी एक दिवशीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्ह्यातील सकल धनगर समाजबांधव सहभागी झाला होता.
यळकोट-येळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आदी घोषणांनी हिंगोली शहर दुमदुमुन गेले. आंदोलना दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडणार नाही. याची खबदारी घेत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनादरम्यान मान्यवरांची भाषणे झाली. सध्याचे सरकार धनगर समाजाच्या मतांवर निवडून आले आहे. याची जाणही सरकारला आहे. त्यामुळे धनगर समाजाला निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पाळावे. आणि आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात पारंपारिक वेशभूषेत खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी धरून तरूण सहभागी झाले होते. धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीचे निवेदन प्रशासनास सादर करण्यात आले.