हिंगोलीत वानरांचा उच्छाद; बारा जणांना घेतला चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 05:40 PM2018-12-08T17:40:49+5:302018-12-08T17:41:16+5:30
शहरात मागील तीन महिन्यांपासून वानरांनी उच्छाद घातला आहे.
हिंगोली : शहरात मागील तीन महिन्यांपासून वानरांनी उच्छाद घातला आहे. असून अनेकांना चावा घेतला आहे. जिल्हा रूग्णालयात चावा घेतलेल्यांची संख्या १२ च्यावर आहे. तर काही बालकांवर जिल्हा रूग्णालयात उचार सुरू आहेत. वनविभागाकडून मात्र याबाबत दखल घेतली जात नाही.
हिंगोली शहरातील पलटण भागात काही महिलांना तसेच बालकांना वानराने अचानक हल्ला करून चावा घेतल्याच्या घटनाही घडल्या आहेत. ७ डिसेंबर रोजी हिंगोली शहरातील तोफखाना येथील गौस शेख खलील या बालकास वानराने चावा घेतल्याची घटना घडली. सध्या जिल्हा रूग्णालयात या बालकांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा रूग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. गोपाल कदम यांनी सांगितले.
सध्या जंगलक्षेत्रातील पाणवट्यांमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने वन्यजीव मानवी वस्तीकडे कूच करीत आहे. परंतु काही वानरांनी अचानक हल्ला केल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील तीन महिन्यांत वानराने चावा घेतलेल्या १२ जणांवर उपचार करण्यात आल्याची नोंद जिल्हा रूग्णालयात आहे. तर काहींनी खाजगी रूग्णालयातही उपचार घेतले आहेत. रेबीजचे इंजेक्शन आणि रेबीजचे अॅन्टी सिरप वानर चावलेल्या व्यक्तीस दिले जाते, असे डॉक्टरांनी सांगितले. दिवसेंदिवस वानराने हल्ला करून चावा घेतलेल्या घटनाकडे वन विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. शिवाय वानरांच्या बंदोबस्ताची मागणी नागरिकांतून केली जात आहे.