हिंगोलीत चौक सुशोभिकरणाने सौंदर्यात भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:35 AM2021-09-24T04:35:06+5:302021-09-24T04:35:06+5:30
हिंगोली शहरात मागील काही दिवसापासून रस्त्याची कामे झाल्याने शहरातील विविध चौकांमध्ये विस्तीर्ण जागा उपलब्ध झाल्या आहेत. शिवाय काही ठिकाणी ...
हिंगोली शहरात मागील काही दिवसापासून रस्त्याची कामे झाल्याने शहरातील विविध चौकांमध्ये विस्तीर्ण जागा उपलब्ध झाल्या आहेत. शिवाय काही ठिकाणी महापुरुषांचे पुतळे असून, अशा ठिकाणी सुशोभिकरणासाठीचा प्रस्ताव अनेक दिवसापासून चर्चेत होता. शहरातील २४ ठिकाणी सुशोभिकरण करण्यासाठी नगरपालिकेने प्रस्तावित केले होते. यासाठी काही खासगी तर काही न.प.च्या निधीतून कामे केली जाणार आहेत. यामध्ये नगरपालिकेच्या वतीने आता काही ठिकाणी सुशोभिकरणाची कामे केली जात आहेत. अग्रसेन चौक, महात्मा गांधी चौक परिसर, न.प. अग्निशामक दलाच्या समोरील भाग आदी ठिकाणी कारंजे उभारण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी इतर कामे करण्यात येत आहेत.
नुकतीच शहरातील काही कामे पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी पाहिली. त्यांनी या कामाचे कौतुक केले. पालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या या कामामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत असून, शहराला नवे वैभव प्राप्त होत असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी शहरात इतर ठिकाणीही अशी कामे होणार असल्याची माहिती देत महापुरुषांच्या पुतळा परिसराचे सुशोभिकरण करण्यात येत असल्याचे सांगितले.