हिंगोली शहरात नगरपालिकेची पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 02:23 PM2019-01-12T14:23:56+5:302019-01-12T14:25:14+5:30
या मोहिमेत औंढा मार्गासह बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली.
हिंगोली : शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगरपालिकेने शनिवारी अचानक हाती घेतली. या मोहिमेत औंढा मार्गासह बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. मुलीच्या छेडछाडीच्या एका प्रकारानंतर या अतिक्रमणांवर गंडांतर आले.
नगरपालिकेने गतवर्षी शहरातील विविध भागातील अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम राबविली होती. मात्र पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. यातच मागील आठवड्यातील एका मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणानंतर या अतिक्रमणांकडे लक्ष वेधल्या गेले.
आज सकाळी पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुधाकर आडे यांच्यासह कर्मचाऱ्यांचा ताफा अग्रसेन चौक परिसरात दाखल झाला. त्यांनी या मार्गावरील अतिक्रमणांवर जेसीबी चालविला. यात अनेकांच्या टपऱ्या, खोक्यांचे नुकसान झाले. इतर काहींनी तर संधी साधून घटनास्थळावरून पलायन केले.
याबाबत मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, नागरिकांनी अतिक्रमणे स्वत:हून काढून घ्यावी अन्यथा कुणाचाही मुलाहिजा न करता थेट कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.