मानसिक त्रासातून जिल्हा रुग्णालयातील सेवकाने केले गोळ्यांचे अतिसेवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 03:32 PM2019-04-09T15:32:18+5:302019-04-09T15:34:26+5:30
कृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
हिंगोली : जिल्हा सामान्य रूग्णालयातील एका कक्ष सेवकाने मानसिक त्रासातून गोळ्यांचे अतिसेवन केल्याची घटना आज दुपारी (दि.९) घडली. अनिल भगत असे सेवकाचे नाव असून त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सविस्तर माहिती अशी की, जिल्हा रूग्णालयात कक्षसेवक म्हणून अनिल भगत कार्यरत आहेत. परंतु त्यांना रूग्णालयातीलच काही कर्मचारी पैसे मागत आहेत, तसेच पैसे न दिल्यास मानसिक त्रास देत असल्याचे सेवक भगत यांनी सांगितले. सदर कर्मचाऱ्यास कशासाठी पैशाची मागणी करीत आहेत याचा मात्र उलगडा होऊ शकला नाही, शिवाय भगत यांनीही याबाबत स्पष्ट सांगितले नाही. सध्या भगत यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
सदर घटनेची माहिती जिल्हा शल्य चिकत्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांना मिळताच ते अपघात कक्षात हजर होऊन भगत यांची विचारपूस केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवारही आले होते. घटनेमुळे जिल्हा रूग्णालय परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
तर संबधितांवर कार्यवाही करणार
सदर घटनेबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांना विचारले असता, याबाबत चौकशी करून संबधितांवर कार्यवाही केली जाईल असे त्यांनी सांगितले.