हिंगोलीत कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 01:20 AM2018-08-10T01:20:14+5:302018-08-10T01:20:44+5:30
जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच रस्ते निर्जन होते. बस बंद, शाळा, महाविद्यालये बंद होती. त्यातच रेल्वे रोको आंदोलनानंतर ही सेवाही ठप्प झाली. सेनगाव वगळता सर्वत्र शांततेत बंद पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच रस्ते निर्जन होते. बस बंद, शाळा, महाविद्यालये बंद होती. त्यातच रेल्वे रोको आंदोलनानंतर ही सेवाही ठप्प झाली. सेनगाव वगळता सर्वत्र शांततेत बंद पार पडला.
शहरात शुकशुकाट
हिंगोली येथील म. गांधीचौकात ठिय्या आंदोलनात अकराव्या दिवशी शासनाचा विरोध करीत घोषणबाजी केली. आरक्षण मिळालेच पाहिजे ते आमच्या हक्काचे आहे, असे म्हणत निषेध करण्यात आला. यावेळी भजन, पोवाडे, भाषणे झाली. ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. शालेय विद्यार्थ्यांनीही भाषणे सादर करून आम्हाला आरक्षणाची गरज आहे, ते मिळालेच पाहिजे अशी मागणी केली जात होती. विविध कार्यक्रम, घोषणाबाजीने शहर परिसर दुमदुमून गेले होते. शहरासह ग्रामीण भागातील आंदोलक ठिय्या आंदोलनास्थळी एकत्र जमले. मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
हिंगोली : येथील आगारातून गुरुवारी एकही बस बाहेर पडली नाही. रस्त्यावरही वाहनांचा पत्ता नव्हता. प्रत्येक चौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. त्याशिवाय पेट्रोलिंगवर पोलिसांची वाहने होती. दुचाकीवरूनही अनेक पोलीस कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. विशेष म्हणजे आज कोठेही मोठा जमाव नव्हता. त्या-त्या भागातील आंदोलकांनी आपापल्या भागात आंदोलन केले. अकोला बायपास, लाला लजपतरायनगर, रिसाला बाजार, गांधी चौक, कारवाडी परिसर अशा अनेक ठिकाणी आंदोलकांनी रास्ता रोको केला.
शहरातील मुख्य भाग असलेल्या गांधी चौकात ठिय्या आंदोलन सुरूच आहे. अग्रसेन चौकात आज पुन्हा मुंडन आंदोलन करण्यात आले. यामध्ये पन्नास ते साठ जणांनी शासनाच्या निषेधार्थ मुंडन केले. यावेळी सरकारविरोधी घोषणा मोठ्या प्रमाणात दिल्या जात होत्या. तालुक्यात कनेरगाव नाका येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. अकोला बायपासवर टायर जाळून आंदोलकांनी रस्ता बंद केला होता. त्याचबरोबर येथे भजन आंदोलनही केले. तर खिचडी शिजवून प्रवाशांना वाटप करण्यात आली.
वसमत तालुक्यात रेल्वे रोको
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे रेल्वे रोको आंदोलन केले. अकोला-पूर्णा पॅसेंजर अडविण्यात आली. त्याचबरोबर कौठा येथे सात वाजता नांदेड-जिंतूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. वसमत शहरातही कडकडीत बंद होता. व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली होती. कुरुंदा, गिरगाव, हट्टा, हयातनगर, आंबा आदी मोठ्या गावांतही बंदला प्रतिसाद मिळाला.
प्रवाशांना खिचडी वाटप
वसमत तालुक्यातील कौठा येथील आसना नदीच्या पुलावर प्रवासात अडकलेल्यांना आंदोलकांनी खिचडीचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
सेनगावात स्कूलबस जाळली
सेनगव येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनास हिंसक वळण मिळाले. आंदोलकांनी स्कूल बस जाळल्याची घटना सकाळी आठच्या सुमारास घडली. कडोळी येथे बसस्थानकावर टायर जाळून निषेध नोंदविण्यात आला. तर गारखेडा येथील युवकांनी कडोळी-भगवती रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको केला. सवना येथेही कडकडीत बंद पाळून रास्ता रोको केला. तर आंदोलकांनी रस्त्यावरच स्वयंपाक केला.
कळमनुरीतही बंद
कळमनुरी येथे रास्ता रोको करून बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर तालुक्यातील नांदापूर येथील टी पॉर्इंटवर रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे लावून रस्त्यावर खिचडी शिजविण्यात आली. जवळपास दोन हजार आंदोलक रस्त्यावर उतरले होते. डोंगरकडा, हिवरा येथेही कडकडकीत बंद होता. डोंगरकड्यात राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मारला होता. जवळा पांचाळ येथेही गाव बंद केले.
बाळापुरात रक्तदान
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जमलेल्या आंदोलकांनी रस्त्यावर रक्तदानाचा स्तुत्य उपक्रम घेतला. त्याला प्रतिसादही मिळत होता. अगदी सुरुवातीलाच दहा ते पंधरा जणांनी रक्तदान केले. आंदोलकांनी रास्ता रोकोही केला.
औंढ्यातही बंद, रास्ता रोको
औंढा नागनाथ येथेही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद होता. याशिवाय जिंतूर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. जवळा बाजार येथेही कडकडीत बंद पाळून नागेशवाडी ते झीरोफाटा रस्ता बंद करण्यात आला होता.
रूग्णवाहिकेला रस्ता मोकळा
आंदोलनादरम्यान गंभीर रूग्ण घेऊन जाणाºया रूग्णवाहिकांना रस्ता दिला जात होता. हिंगोली शहरालगतच्या अकोला बायपास येथे भजन आंदोलन सुरू असताना दोन रूग्णवाहिका येथून जात होत्या. यावेळी आंदोलकांनी या रूग्ण वाहिकांना रस्ता मोकळा करून दिला.
चार तास रेल्वे उभीच
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे पांगरा शिंदे फाटा अकोला ते पुर्णा रेल्वे रोको करण्यात आला. त्यामुळे अकोला येथून निघालेली इंटरसिटी एक्सप्रेस तब्बल चार तास स्थानकातच उभी होती. हिंगोली रेल्वेस्थानकातून दरदिवशी सकाळी सकाळी ११.३२ वाजता ही गाडी पुर्णा मार्गे सुटते. रेल्वे रोकोमुळे मात्र प्रवाशांची गैरसोय झाली.
बसेस बंद
हिंगोली आगारातून गुरूवारी सकाळपासून एकही बस मार्गावरून धावली नाही. आजही बससेवा बंद राहू शकते असे आगारप्रमुख बी. बी. झरीकर म्हणाले. हिंगोली आगारातील ५४ बसेस परिसरात उभ्या करण्यात आल्या होत्या. कर्मचारीही कार्यालत बसून होते. यापुर्वी आंदोलना दरम्यान हिंगोली आगाराच्या जवळपास चार बसेस फोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे हिंगोली आगाराचे लाखोंचे नुकसान झाले. स्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त होता.
आंदोलना दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबदारी घेत पोलीस प्रशासनाकडून जिल्हाभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जागो-जागी चौकात तसेच सार्वजनिक ठिकाणी पोलीस फौजफाटा तैनात होता. हिंगोली शहरात ८ अधिकारी तर ९५ कर्मचारी बंदोबस्तात असल्याची माहिती पोनि उदयसिंग चंदेल यांनी सांगितले. शहरातून दुचाकीने फेरफटका मारून पोलीस आढावा घेत होते. बंदोबस्ता बाबत पोलीस अधिकारी तसेच कर्मचाºयांना मार्गदर्शन व आवश्यक सूचना पोलीस अधीक्ष योगेश कुमार यांनी दिल्या होत्या. तसेच होमगार्ड पथकातील कर्मचारीही बंदोबस्तात तैनात होते.