हिंगोली बनावट नोटा प्रकरण : पुसदला १० हजारांच्या बनावट, तर नागपूरमध्ये खेळणीतील लाखाच्या नोटा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 06:15 PM2020-09-11T18:15:32+5:302020-09-11T18:17:09+5:30
हिंगोलीतील बहुचर्चित बनावट नोटांप्रकरणी पोलिसांची कारवाई
हिंगोली : येथील बहुचर्चित बनावट नोटांप्रकरणी पोलिसांनी पुसद आणि नागपूर येथून अटक केलेल्या ३ संशयित आरोपींच्या घरांची झाडाझडती घेतली. त्यात पुसद येथील आरोपीच्या घरात १० हजारांच्या बनावट नोटा; तर नागपूर येथील आरोपीच्या घरातून लहान मुलांच्या खेळण्यातील १ लाखांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार संतोष सूर्यवंशी (देशमुख) याच्यासह अन्य तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ झाल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजणे यांनी दिली.
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे आणि एटीएसच्या पथकाने २ सप्टेंबर रोजी बळसोंड भागातील आनंदनगरात एका भाड्याच्या घरात थाटलेला नोटांचा छापखाना उद्ध्वस्त करून मुख्य सूत्रधार संतोष सूर्यवंशी, छाया भुक्तार या दोघांना व नंतर पुसद येथील इम्रानखान अहमद खान पठाण आणि विनोद कुरडे यांना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी नागपूर येथून २ आणि पुसद येथून एका आरोपीस अटक केली. यामुळे सर्व आरोपींची संख्या ७ वर पोहोचली आहे. दरम्यान, मुख्य आरोपी संतोष सूर्यवंशीसह नंतर अटक केलेल्या तीन आरोपींना १० सप्टेंबर रोजी न्यायालयासमक्ष हजर केले असता सूर्यवंशीला १४; तर उर्वरित तिघांना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच तीन आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तपास हिंगोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. ओमकांत चिंचोळकर, पोउपनि. मनोज पांडे, पोलीस कर्मचारी मधुकर पोले, गजानन पवार, भगवान मंडलीक, संदीप जाधव, रूपशे धाबे, महेश बंडे, शेख जमीर, गजानन दांडेकर, गणेश लेकुळे, दिलीप बांगर करीत आहेत.
खऱ्या नोटांमध्ये नकली नोटा घुसवून करायचे फसवणूक
नागपूरमधील आरोपीच्या घरातून लहान मुलांच्या खेळण्यातील (भारतीय चिल्ड्रेन बँक) १ लाखांच्या नोटा जप्त केल्या. खऱ्या नोटांमध्ये दोन ते तीन नकली नोटा घुसवून फसवणूक करण्याचा गोरखधंदा या माध्यमातून चालत होता. तसेच पुसद येथील आरोपीकडून १० हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती रामेश्वर वैंजणे यांनी दिली.
विलास पवारला दिले सोडून
पांढरकवडा येथून ताब्यात घेतलेल्या प्रहार जनशक्तीचा माजी जिल्हाध्यक्ष विलास पवार याला मात्र चौकशीअंती सोडून देण्यात आले आहे. तीन दिवस याबाबत कमालीची गोपनीयता बाळगली जात होती.