हिंगोलीत २२ तास ताटकळले ‘त्या’ बालकाचे प्रेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 03:26 PM2018-06-20T15:26:13+5:302018-06-20T15:26:13+5:30
भूमिगत गटार योजनेच्या खोदकामाच्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मंगळवारी (दि.१९ ) सायंकाळी शेख इब्राहिम शेख खिजर या बालकाचा मृत्यू झाला.
हिंगोली : भूमिगत गटार योजनेच्या खोदकामाच्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मंगळवारी (दि.१९ ) सायंकाळी शेख इब्राहिम शेख खिजर या बालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बालकाचा २२ तास अंत्यविधी थांबला होता. अखेर कंदाटदारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने प्रकरण शांत झाले.
१९ जून रोजी रिसाला बाजार भागात जिल्हा रूग्णालयासमोर सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली. रात्री उशिरा शवविच्छेदन झाले होते. मात्र गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. त्यातच रात्र उलटून आज दुपारी २ वाजेपर्यंत यावर निर्णय झाला नव्हता. हिंगोली शहर पोलीस ठाण्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी केवळ कंत्राटदारावरच गुन्हा दाखल होवू शकते हे समजावले. मात्र जमाव ऐकत नव्हता. शेवटी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढवला होता. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुद्धा तणाव होता. जिल्हा कचेरीत जाऊनही निवेदन न देता शिष्टमंडळ नंतर परत आले. काही जणांनी मयताच्या नातेवाइकांना समजावले. शेवटी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यास नातेवाईक पोलीस ठाण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.