हिंगोलीत धरणग्रस्तांनी काढला जिल्हा कचेरीवर मोर्चा
By विजय पाटील | Published: October 2, 2023 07:13 PM2023-10-02T19:13:06+5:302023-10-02T19:13:19+5:30
कुटुंबांना न्याय देण्यासाठी पुन्हा सर्व्हे करण्याची मागणी धरणग्रस्तांनी केली.
हिंगोली : धरणग्रस्त विकास संघर्ष समितीच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात विविध भागातून आलेले विस्थापित मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
जिल्ह्यात इसापूर, येलदरी, सिद्धेश्वर धरणांमध्ये अनेक गावे गेली. या सर्व बाधितांचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सर्व्हे करून जीवनमान तपासण्याची मागणी करण्यात आली. तर त्यांचे शासकीय नियमाप्रमाणे पुनर्वसन झाले नाही. त्या तुलनेत आर्थिक मोबदला मिळाला नाही. धरणग्रस्तांना प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळाले नाही. त्या तुलनेत नोकरीत संधी मिळाल्या नाहीत. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. आता भूमिहीन झालेली ही मंडळी वेठबिगारीचे दिवस कंठत आहे. त्यामुळे अजूनही या कुटुंबीयांचे हाल होत आहेत.
या कुटुंबांना न्याय देण्यासाठी पुन्हा सर्व्हे करण्याची मागणी धरणग्रस्तांनी केली. यामध्ये आठ ते दहा प्रकारच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. अहिल्यादेवी होळकर चौकात आधी धरणग्रस्तांची परिषद झाली. या परिषदेत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर परिषदेत सहभागी झालेली सर्व मंडळी मोर्चा काढून जिल्हा कचेरीवर धडकली. तेथे नायब तहसीलदार जोशी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी धरणग्रस्तांनी आपल्या विविध मागण्या घोषणा देत मांडल्या. यामध्ये विविध पक्षांची नेतेमंडळीही सहभागी झाली होती. धरणग्रस्तांच्या या मागण्यांना काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, भाजप, प्रहार जनशक्ती आदी पक्षांच्या मंडळींनी पाठिंबा दिल्याचे दिसून येत होते.