हिंगोलीत महापुरूषांच्या पुतळ्यांना होर्डिंग्जचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 11:49 PM2019-01-25T23:49:28+5:302019-01-25T23:49:44+5:30
शहरातील विविध चौक परिसर व सार्वजनिक ठिकाणे होर्डिंग व बॅनरने हाऊसफुल झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे महापुरूषांच्या पुतळ्यांचीही यातून सुटका झाली नाही. शहरातील चौका-चौकात तसेच पुतळा परिसरात राजकीय व वाढदिवसानिमित्त लावलेल्या होर्डिंगचा विळखा घातला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील विविध चौक परिसर व सार्वजनिक ठिकाणे होर्डिंग व बॅनरने हाऊसफुल झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे महापुरूषांच्या पुतळ्यांचीही यातून सुटका झाली नाही. शहरातील चौका-चौकात तसेच पुतळा परिसरात राजकीय व वाढदिवसानिमित्त लावलेल्या होर्डिंगचा विळखा घातला आहे.
विविध राजकीय पुढाऱ्यांचे तसेच वाढदिवस, विविध प्रतिष्ठानांच्या डिजिटल बॅनरने सध्या हिंगोली शहराला विळखा घातला आहे. यात अनेकांनी तर नगरपालिकेची कुठलीच परवानगी न घेता बॅनर सार्वजनिक ठिकाणी लावले आहेत. याकडे पालिकेची संबंधित यंत्रणाही लक्ष देण्यास तयार नाही. शिवाय पालिकेतर्फे केवळ थातूर-मातूर कारवाई केली जाते. परिणामी ‘जैसे थे’ चित्र निर्माण होत आहे. हिंगोली शहरातील मुख्य रस्त्यावरील श्री अग्रसेनजी महाराज चौक यांचा पुतळा तर संपूर्ण होर्डिंगने भरून गेला आहे. तसेच महात्मा गांधी चौक परिसरालाही होर्डिंग्जचा विळखा आहे. शहरातील महावीर स्तंभाजवळ तर पालिकेचेच बॅनर लावल्याचे चित्र आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरच हातगाडे, आॅटो व खाजगी वाहने बिनदिक्कतपणे उभे केली जातात. त्यामुळे होर्डिंग्जचा त्रास वाचला. मंगळवारी बाजाराच्या दिवशी तर येथून पायी चालणेही कठीण होते, शिवाय वाहतुकीची कोंडी होऊन किरकोळ अपघाताच्या घटनाही घडतात. साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळा परिसरात केवळ खड्डे खोदून ठेवले आहेत.
काही ठिकाणी नगरपालिकेची परवानगी घेऊन होर्डिंग्ज लावले जात आहेत. मात्र अनेक अवैध होर्डिंग्ज शहराला बकालावस्थेच्या खाईत ढकलत आहेत. विशेष म्हणजे होर्डिंग्ज कुठे लावावीत, याचा तर काही नियमच नाही. त्यामुळे महापुरुषांचे पुतळे, स्तंभ या होर्डिंग्जमागे दडत आहेत. पुढाºयांना प्रसिद्धीचा सोस असतो म्हणून ते याचे सोयरसुतक पाळत नसले तरीही पालिकेनेही स्वत:च्या होर्डिंग्ज अशाच पद्धतीने लावल्याचे दिसत आहे.