आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज रस्त्यावर; जिल्हाभरात धरणे व रास्तारोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 06:25 PM2018-08-13T18:25:02+5:302018-08-13T18:31:00+5:30
धनगर जातीला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी समाजबांधवांतर्फे आज जिल्हाभरात विविध ठिकाणी धरणे व रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
हिंगोली : धनगर जातीला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी समाजबांधवांतर्फे आज जिल्हाभरात विविध ठिकाणी धरणे व रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सरकार सोडविण्यात अपयशी ठरत आहे. तसेच धनगड जातीच्या नावावर धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवल्या जात आहे. त्यामुळे जिल्हाभरात आंदोलन सुरू आहेत.
औंढा नागनाथ तालुक्यातील धनगर समाजबांधवातर्फे औंढा- पिंपळदरी रस्त्यावर सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करीत रास्ता रोको करण्यात आला. तसेच औंढा तालुक्यातील शिरडशहापूर येथे १३ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता औंढा- वसमत मुख्य राज्य रस्त्यावर सेंदुरसना पाटीवर एक तास रास्ता रोको करण्यात आला. सेनगाव तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने हिंगोली - जिंतूर टीपाँइट रस्त्यावर तीन तास रास्ता रोको आंंदोलन केले. तसेच धनगर समाजाला आरक्षण देवून अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करावे, या मागणीसाठी धनगर समाज बांधवांनी आखाडा बाळापूर येथे दोन तास रास्तारोको आंदोलन केले.
वसमत तालुक्यातील धनगर समाजबांधवांच्या वतीने अनुसूचित जमातीच्या घटनेप्रमाणे धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी मोर्च्या काढून मागणीचे निवेदन नायब तहसीलदार सचिन जैस्वाल यांना दिले. हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे रास्तारोको करण्यात आला. वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे कडकडीत बंद होता. समाजबांधवाकडून निषेध रॅली काढून आंदोलन करण्यात आले. जिल्हाभरात विविध ठिकाणी रास्ता रोको व धरणे आंदोलनामुळे वाहतूक ठप्प होती.