HSC Result 2024: हिंगोली जिल्ह्याचा निकाल ९१.८८ टक्के, विज्ञान शाखेची टक्केवारी सर्वाधिक
By विजय पाटील | Published: May 21, 2024 04:09 PM2024-05-21T16:09:12+5:302024-05-21T16:09:27+5:30
मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.२५ तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.१५ टक्के आहे.
हिंगोली : जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून १२ हजार ६४७ विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाले असून यापेकी ११९९ जणांनी विशेष प्राविण्यात उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे.विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९७.६६ टक्के निकाल लागला आहे.
हिंगोली जिल्ह्यात विज्ञान शाखेतील ७२८५ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज केला होता. यापैकी मुले ३९०५ व मुली ३३०४ असे ७२०९ जण परीक्षेला बसले. यातील ७०४१ उत्तीर्ण झाले. यात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.२५ तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.१५ टक्के आहे. एकूण ९७.६६ टक्के निकाल लागला आहे. किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमासाठी हिंगोली जिल्ह्यातून २३४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला.२३० जणांनी परीक्षा दिली. २०८ जण उत्तीर्ण झाले. यात १४५ मुले तर ६१ मुलींचा समावेश आहे. येथेही मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.८७ टक्के तर मुलांचे ९३.८४ टक्के आहे.
पुरवणी परीक्षेतही यश
पुरवणी परीक्षेतही विज्ञान शाखेतून १०३ जण उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण ५३.०९ टक्के आहे. कला शाखेत २४० पैकी १२६ उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण ६१.०८ टक्के आहे. किमान कौशल्यावर आधारितचे ८ पैकी ५ उत्तीर्ण झाले असून प्रमाण ६२.५० टक्के आहे. वाणिज्य शाखेत ९ पैकी ४ जण उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण ४४.४४ टक्के आहे.
कला शाखेत मुली अव्वल
हिंगोली जिल्ह्यात कला शाखेच्या ५ हजार ७३८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला. यातल ५६०८ परीक्षेला बसले होते. यापैकी ४७२८ उत्तीर्ण झाले. यामध्ये २ हजार ६०२ मुले तर २१२४ मुलींचा समावेश आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७९.६९ टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.६५ टक्के असून दोन्हींमध्ये दहा टक्क्यांचे अंतर आहे. मुलींची कामगिरी जास्त सरस ठरली आहे. एकूण निकाल ८४.२७ टक्के लागला.
वाणिज्य शाखेचा निकाल ९४ टक्के
वाणिज्य शाखेतील ७२२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. यापैकी ७१७ जणांनी परीक्षा दिली. तर ६७४ जण उत्तीर्ण झाले. यात ३३५ मुली तर ३३९ मुले आहेत. यात मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.५४ तर मुलींचे ९७.६९ टक्के एवढे आहे.