हिंगोली जिल्ह्यात १७१ पाणी नमुने आढळले दूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 04:42 PM2018-03-26T16:42:08+5:302018-03-26T16:42:08+5:30
आता टंचाईचा काळ सुरू झाल्याने मिळेल ते पाणी वापरण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे
हिंगोली : आता टंचाईचा काळ सुरू झाल्याने मिळेल ते पाणी वापरण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे. त्यातच दूषित पाणीनमुन्यांचे प्रमाणही वाढत चालले असून विशेषत: कळमनुरी तालुक्यात सर्वाधिक पाणीनमुने दूषित आढळून येत आहेत. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे.
यंदा अल्पपर्जन्यामुळे जिल्ह्याच्या काही भागात टंचाईच्या तीव्र झळा जाणवत असतानाही प्रशासनाची दिरंगाई टंचाईत उपाययोजना न होण्यास कारणीभूत ठरत आहे. तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे गारपीट, पावसासह ढगाळ वातावरणाचा सामना करावा लागला. यामुळे चार दिवसांपूर्वीच आटणारे स्त्रोत कसेतरी चार दिवस लांबले. मात्र आता टंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. तर अनेक ठिकाणी पाणीस्त्रोतही दूषित असल्याचे आढळून येत आहे. यातील काही तर टंचाईत बंदही झाले आहेत. अनेक ठिकाणी टीसीएल पावडरचा वापर अजूनही होत नसून यंदाच्या वातावरण बदलामुळे तर शुद्ध पाणीपुरवठा आवश्यक आहे. मात्र तसे होत नसल्याने रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय चित्र
हिंगोली तालुक्यात नर्सी नामदेव केंद्रात २७ पैकी ६, भांडेगावात ३२ पैकी २, सिरसम २० पैकी ०, फाळेगावात १९ पैकी ११, वसमत तालुक्यात हट्टा १९ पैकी ११, कुरूंद्यात २३ पैकी १, हयातनगरात ३५ पैकी ११, गिरगावला २० पैकी ३, टेंभुर्णीत २२ पैकी ६, पांगरा २० पैकी ०, सेनगाव तालुक्यात गोरेगाव २० पैकी ५, कवठा १९ पैकी १२, साखरा २९ पैकी ३, कापडसिंगी २० पैकी ७, जवळाबाजारमध्ये २४ पैकी ३, शिरडशहापूर १९ पैकी ०, पिंपळदरीत १० पैकी १, लोहर्यात ३४ पैकी १३ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. तर कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूरात १७ पैकी ८, डोंगरकड्यात ३६ पैकी १३, रामेश्वर तांड्यात ४१ पैकी १२, पोत्र्यात ४२ पैकी १८, मसोडला ४२ पैकी २१ तर वाकोडीत ६४ पैकी ४ पाणी नमुने दूषित आढळले.