हिंगोली जिल्ह्यात २५४ पाणीनमुने दूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:17 AM2018-08-18T00:17:08+5:302018-08-18T00:17:25+5:30
हिंगोली : जिल्ह्यात पावसाळ्यानंतर अनेक जलस्त्रोतांना पाणी आले. मात्र अशा स्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर न केल्याने दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात ९३२ पैकी २७८ पाणीनमुने दूषित आढळले. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात पावसाळ्यानंतर अनेक जलस्त्रोतांना पाणी आले. मात्र अशा स्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर न केल्याने दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात ९३२ पैकी २७८ पाणीनमुने दूषित आढळले. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे.
जिल्ह्यात यंदा चांगले पर्जन्यमान होत आहे. तर ढगाळ वातावरण कायम राहात आहे. अशा परिस्थितीत आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची भीती असते. त्यातच पाणी दूषित प्यायल्यास साथीच्या आजारांना निमंत्रण देण्यासारखेच असते. मात्र तरीही अनेक ठिकाणी ग्रामपंचायतींकडून पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापर केला जात नाही. परिणामी, ग्रामस्थांना तेच पाणी पिण्याची वेळ येते. मागील महिन्यात केलेल्या पाणीनमुने तपासणीत ही बाब समोर आली आहे. यात प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय तपासलेल्या नमुन्यांसह दूषित आढळलेल्या नमुन्यांचे चित्र पुढीलप्रमाणे आहे. हिंगोली तालुक्यात नर्सी नामदेव ३८ पैकी १८, भांडेगाव ४५ पैकी ०, सिरसम ३० पैकी ११, फाळेगाव ३६ पैकी ०, तर वसतममध्ये हट्ट्यात २५ पैकी ०, कुरूंद्यात ५५ पैकी ४, हयातनगर ३४ पैकी ९, गिरगाव १७ पैकी १0, टेंभूर्णी ३७ पैकी ५, पागंरा शिंदे ४८ पैकी ९, कळमनुरीमध्ये आखाडा बाळापूर २० पैकी १०, डोंगरकड्यात ४२ पैकी ११, रामेश्वर तांडा ४८ पैकी २८, पोतरा ५२ पैकी २८, मसोड ३८ पैकी ५, वाकोडी ९३ पैकी ५३, तर सेनगावमध्ये गोरेगाव ३१ पैकी ५, कवठा २३ पैकी १६, साखरा ६१ पैकी ८, कापडसिंगी ४० पैकी २५, तर औंढा नागनाथ तालुक्यात जवळा बाजार ३९ पैकी ४, शिरड शहापूर ३० पैकी ५, पिंपळदरी ३१ पैकी ७, लोहरा १९ पैकी ७ असे ९३२ पैकी २७८ पाणीनमुने दूषित आढळून आले आहेत.
ब्लिचिंग पावडर : १ नमुना अप्रमाणित
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ब्लिचिंग पावडर नाही. मात्र ६३ ग्रामपंचायतींच्या ब्लिचिंग पावडवरचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीस पाठविण्यात आले होते. त्यापैकी एक अप्रमाणित असल्याचे आढळून आले आहे. जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गतचे हे गाव आहे.
आखाडा बाळापूर, गिरगाव, हयातनगर या आरोग्य केंद्रांनी तर एकाही ठिकाणी ब्लिचिंग पावडरची तपासणी केली नाही. इतरांनीही एक-दोन नमुने घेत औपचारिता पूर्ण केली. डोंगरकड्यात सर्वाधिक ८ नमुने तपासण्यात आले आहेत.
ग्रामपंचायतींनी पावसाळ्याचे दिवस असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ब्लिचिंग पावडरचा वापर करून शुद्ध पाणीपुरवठा होईल, याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडुन करण्यात आले.