हिंगोली जिल्ह्यात ३ जण गेले पुरात वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:32 AM2021-09-26T04:32:01+5:302021-09-26T04:32:01+5:30

हिंगोली : जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये २५ सप्टेंबर रोजी तिघे जण वाहून गेले होते, ते अजून सापडले नसून अन्य दोन ...

In Hingoli district, 3 people were swept away by floods | हिंगोली जिल्ह्यात ३ जण गेले पुरात वाहून

हिंगोली जिल्ह्यात ३ जण गेले पुरात वाहून

Next

हिंगोली : जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये २५ सप्टेंबर रोजी तिघे जण वाहून गेले होते, ते अजून सापडले नसून अन्य दोन जण मात्र सुखरूप आढळून आले आहेत. यापैकी दोन घटना सेनगाव तालुक्यातील असून एक हिंगोली तालुक्यातील पारोळा येथील आहे.

जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. शनिवारीही सकाळपासूनच सर्वदूर पाऊस कोसळत होता. यामुळे नदी, ओढ्यांना पूर आला होता. शेतातील पिकेही पाण्याखाली गेली असून मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील नदी, ओढ्यांना आलेल्या पुराच्या पाण्यात ५ जण वाहून गेले. हिंगोली तालुक्यातील पारोळा परिसरात शनिवारी झालेल्या पावसामुळे येथील तलावही भरला. सांडव्यावरून खाली पडणाऱ्या पाण्याला धबधब्याचे स्वरूप आले आहे. हा धबधबा पाहण्यासाठी हिंगोलीतील काही मित्र शनिवारी दुपारी गेले होते. यावेळी यातील कुणाल बंडू खंदारे (वय २०, रा. गणेशवाडी, हिंगोली) याचा पाय घसरून तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जात होता. त्याला वाचविण्यासाठी शिवम कैलास खंदारे (वय १९) व सचिन मधुकर शिंदे (वय २०) यांनी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तिघेही वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मळघणे, बीट जमादार संतोष वाठोरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने पथकाने वाहून गेलेल्या तरुणांचा शोध सुरू केला. यावेळी यातील शिवम कैलास खंदारे व सचिन मधुकर शिंदे हे दोघे काही अंतरावर सापडले. दोघेही सुखरूप असून कुणाल खंदारे याचा पोलीस शोध घेत आहेत, तर भोला गाढे, नरेश कांबळे, सचिन भाग्यवंत हेही आधी वाहून गेले की काय? अशी शंका व्यक्त होती. मात्र, ते सुखरूप घरी पोहोचले आहेत.

- मन्नास पिंपरी, साखरा तांडा येथील दोघांचा शोध सुरू

सेनगाव तालुक्यातील मन्नास पिंपरी व साखरा तांडा परिसरातही शनिवारी सकाळपासून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ओढ्यांना पूर आला होता. यात मन्नास पिंपरीजवळील आलेल्या ओढ्याच्या पुरात संतोष कोंडुजी गायकवाड (रा. हिवरा गायकवाड) हे वाहून गेले. ते मन्नास पिंपरी येथे आले होते. गावाकडे परत जात असताना ही घटना घडली, तर साखरा तांडा शिवारातील ओढ्याला आलेल्या पुरात ४५ वर्षीय मूकबधिर व भोळसर महिला सावित्रीबाई थावरा चव्हाण (रा. साखरा तांडा) असे वाहून गेलेल्या महिलेचे नाव आहे. दोघांचाही शोध सुरू आहे.

(फाेटाे क्र : २५ एचएनएलपी १२ - संतोष कोंडजी गायकवाड वय ४१

२५ एचएनएलपी १३ - कुणाल बंडु खंदारे वय १७ )

Web Title: In Hingoli district, 3 people were swept away by floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.