हिंगोली जिल्ह्यात चार शेतकऱ्यांच्या नावे परस्पर उचलले पिककर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 02:56 PM2021-05-25T14:56:11+5:302021-05-25T14:57:09+5:30
तालुक्यातील जामदया येथे पिककर्ज घेण्यासाठी कधीच बँकेत न गेलेल्या चार शेतकऱ्यांचे नाव कर्ज माफीच्या यादीमध्ये आले.
सेनगाव: दस्तऐवज तयार करून जामदया येथील चार शेतकऱ्यांच्या नावे येथील स्टेट बँक आँफ इंडिया बँकेच्या शाखेतून पिक कर्ज घेतल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. यात एकूण ४ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले असून संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील जामदया येथे पिककर्ज घेण्यासाठी कधीच बँकेत न गेलेल्या चार शेतकऱ्यांचे नाव कर्ज माफीच्या यादीमध्ये आले. आपले खोटे दस्तावेज देऊन एसबीआय बँकेच्या शाखेतून पीककर्ज परस्पर उचल्याचे स्पष्ट झाल्याने चारही शेतकऱ्यांना धक्काच बसला. याबद्दल अधिक माहिती घेतली असता अर्जुन पांडुरंग डाखोरे यांच्या नावे १ लाख ९९ हजार तर त्यांच्या मुलाच्या नावे २५ ऑगस्ट २०१६ ला ९० हजार, गावातीलच अन्य दोघांच्या नावे ३० सप्टेंबर २०१६ रोजी प्रत्येकी ९० हजाराचे पिककर्ज मंजूर होऊन उचलण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी चारही शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खोटे दस्तऐवज तयार करून एकूण ४ लाख ६९ हजार रुपयांच्या फसवणुकीची तक्रार सेनगाव पोलिसात दाखल करण्यात आली.